Join us  

कोरोना योध्दांसाठी पालिका अधिकारी बनला देवदूत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 5:59 PM

सुभाष दळवी यांनी कोविड योध्दा करिता स्ट्रेस मॅनेजमेंट कार्यशाळा घेतल्या.

 

मनोहर कुंभेजकर

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड-१९ (कोरोना व्हायरस) या रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता महानगरपालिकेच्या सर्व विभागातील विशेषतः रुग्णालयातील कामगार, कर्मचारी व अधिकारी हे कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बाधीत होत आहेत. त्यामधील आजपर्यंत 80 कर्मचाऱ्यांचा मृत्यू देखील झाला आहे.

कोरोना प्रादुर्भाव आणि कोरोना वातावरणात महानगरपालिका कर्मचारी काम करीत असल्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे त्यांच्या शरिरावर व मनावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू होईल या भितीने कर्मचारी व अधिकारी यांच्यावर ताण येत आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा वाढणे, रक्तदाब वाढणे, रक्तामधील साखरेचे प्रमाण वाढणे, मनावर ताण वाढणे, भिती वाटणे, स्नायू व पाठदुखी इत्यादी सारखी लक्षणे वाढीस लागणे,नकारात्मकता वाढणे इत्यादी सारखे दुष्परिणाम आढळून येत आहेत.

या वरील गोष्टींचा अभ्यास करून मुंबई महापालिका घन कचरा व्यवस्थापन विभागाचे विशेष कार्य अधिकारी सुभाष दळवी यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार विविध कोविड-19 व नॉन कोविड रूग्णालयांना भेटी देवून कोविड रूग्णांसोबत आघाडीवर कार्य करणारे अधिष्ठाता,वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी ,डॉक्टर्स, परिचारिका, कक्ष परिचर,आया व सफाई कर्मचारी अशा कोविड योध्दा करिता स्ट्रेस मॅनेजमेंट कार्यशाळा घेतल्या. त्यांच्या समस्या समजावून घेऊन वरिष्ठांशी संल्ला मसलद करून तातडीने समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रशासन कोविड योध्दा व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी निर्माण केला.

स्ट्रेस मॅनेजमेंट कार्यशाळेत सुभाष दळवी यांनी सामाजिक कर्त्यव्याची जाणीव आणि प्रशासनाची भूमिका, संकट समयी आपण कसे खंबीरपणे उभे राहता येईल , तसेच कोरोना विषयीची जाणीव जागृती व प्रतिबंधक उपाययोजना करताना स्वत:ची व कुटूंबाची काळजी घेत सहकाऱ्यांची व रुग्णांची काळजी घेऊन समाजामध्ये आपल्या कामाचा आदर्श कसा उभा करावा याबाबतचे प्रेरणात्मक विचाराने सकारात्मक विचारसरणी त्यांच्यात उभी केली.

या कार्यशाळांमध्ये त्यांनी आपल्यालाच मनपाची व शासकीय नोकरीची संधी का व कशी आणि कशासाठी मिळाली याबाबत प्रत्येक कर्मचाऱ्याने स्वत:ला प्रश्न विचारायला प्रोत्साहित केले आणि आपणच करोनो सारख्या संकटसमयी समाजाला कसा धीर व दिशा देऊ शकतो , आंतरिक उर्जा ही सकारात्मक विचाराने कशी वाढवू शकतो. तसेच मुंबई महापालिका आपल्या कर्मचाऱ्यांची  व त्याच्या कुटूंबाची काळजी कशी घेत आहे आदी सर्व विषयावर त्यांना स्वत:शी बोलते केले.

तसेच मुंबई ,महाराष्ट्र व देशातील नागरिकांना प्रेरणा वाटावी यासाठी आपण कसे कार्य केले पाहिजे याबाबत प्रेरण देवून आपण सर्व कर्मचारी व अधिकारी या पृथ्वीवरील किती पॉवरफूल व्यक्ती आहोत याची जाणीव त्यांच्या अंतर्मनाला करून देण्याचे कार्य त्यांनी केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी मुंबई महापालिकेच्यावतीने दळवी यांनी पथकप्रमुख म्हणून कार्य करताना कामाच्या अनुभवाच्या आधारावर कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष ओरिसा चक्रीवादळ ग्रस्तांच्या मदतीसाठी, गुजरात भूकंपग्रस्ताच्या मदतीसाठी तसेच सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जीवावर उदार होऊन कसे कार्य केले  याचे सचित्र वास्तव उभे करून कर्मचाऱ्यांना प्रेरीत केले आणि त्यांच्यामध्ये कोविड विरोधी लढण्याचा जोश निर्माण करून त्याप्रती लढण्यासाठी प्रतिज्ञा घेऊन विजयी करण्याचा निश्चय केला.

 दळवी यांच्या प्रशिक्षणामध्ये लाभ घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांचे शारिरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारले, कार्यक्षमता वाढली, विचारसरणी सकारात्मक झाली, आत्मविश्वास वाढला, कामा मध्ये एकाग्रता, सकारात्मक विचार, आत्मविश्वास वाढणे असे बदल दिसले. कामाच्या ठिकाणी आनंदी वातावरण निर्माण होऊन दैनंदिन कामकाज व्यवस्थीतपणे पार पाडण्यास मदत झाली. दळवी हे कोविड-19 निर्मूलन कार्यक्रमात कोरोना योध्दांच्या मदतीला देवदूतासारखे धावून आल्याची भावना वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लोकमतकडे व्यक्त केली.

 दळवी हे प्रत्यक्ष् कोविड / नॉन कोविड रूग्णालयामध्ये कर्मचारी व अधिकारी यांना मानसिक आधार देऊन त्यांच्यामध्ये जोश भरण्याचे कार्य सातत्याने करित आहेत. आतापर्यत दळवी यांनी मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलीस कर्मचारी, शासकीय कर्मचारी,अधिकारी , शाळा कॉलेजेचे युवा युवती अशा सुमारे 45 ते 50 हजार लोकांसाठी मानसिक ताण तणाव व्यवस्थापन आणि व्यक्तीमत्व विकास यासाठी कार्यक्रम राबविले आहेत.

  मुंबईतील राजावाडी रूग्णालय घाटकोपर, संत मुक्ताबाई रूग्णालय घाटकोपर , बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रूग्णालय जोगेश्वरी (पूर्व), भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय कांदिवली (प), सावरकर रूग्णालय मुलूंड (पू), एमटी अग्रवाल रूग्णालय मुलूंड (प), क्रांती ज्योती महात्मा फुले रूग्णालय विक्रोळी(पू), एमडब्ल्यू देसाई रूग्णालय, मालाड (पूर्व), व्हीएन देसाई रूग्णालय, सांताक्रुझ् (पू), कामगार रूगालय कांदीवली (पू), सायन, नायर, केईएम आणि भाभा रूग्णालय बांद्रा (प ) या ठिकाणी वरील कार्यक्रम आयोजित केले आहे. याशिवाय महापालिका मुख्यालयात विधी खात्यातील कर्मचारी व अधिकारी वर्गासाठीही त्यांनी कार्यक्रम आयोजित केला आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना दूरध्वनीच्या  सोशल मिडीयाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे उंचाविण्यासाठी सुभाष दळवी सतत प्रयत्नशील आहेत. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई