Join us  

अंगणवाडी सेविका जून महिन्यात धडकणार मंत्रालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 3:20 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आॅक्टोबर २०१८ मध्ये राज्यातील अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांच्या मानधनात दुपटीने वाढ केली होती.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आॅक्टोबर २०१८ मध्ये राज्यातील अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांच्या मानधनात दुपटीने वाढ केली होती. नोव्हेंबर २०१८ मध्ये ही मानधनवाढ अंगणवाडी सेविकांना मिळणे अपेक्षित होते. मात्र राज्य शासनाने अद्यापही मानधनवाढ लागू केलेली नाही. याविरोधात राज्यभरातील अंगणवाडी सेविका जून महिन्यात मंत्रालयावर धडकणार आहेत.अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार आंदोलन करूनही सरकारकडून फक्त आश्वासन मिळत असल्याने अंगणवाडी सेविका संतप्त झाल्या आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अंगणवाडी सेविका प्रत्येक जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. या मोर्चानंतरही कुठला प्रतिसाद मिळाला नाही, तर ११ जून रोजी अंगणवाडी सेविका मंत्रालयावर विराट मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडणार आहेत. राज्याच्या विविध भागांतील जवळपास दोन लाख अंगणवाडी सेविका या मोर्चात सहभागी होणार आहेत. मानधनात वाढ करा, सरकारी सेवेत सामावून घ्या, कर्मचाऱ्यांना मासिक ५ हजार रुपये पेंशन योजना लागू करा, अंगणवाडी केंद्राच्या कामासाठी रजिस्टर, अहवाल फॉर्म द्या, वर्षातून १५ दिवसांची आजारपणासाठी भरपगारी रजा, अंगणवाडी सेविकांची त्यांच्या इच्छेनुसार आवश्यक ठिकाणी रिक्त जागी बदली करा या प्रमुख प्रलंबित मागण्या आहेत.जिल्हा परिषदेच्या कार्यालयावरही मोर्चाराज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी सांगितले की, राज्य सरकार अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीबाबत कोणत्याही हालचाली करत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या अंगणवाडी सेविकांनी आता जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या ठाणे येथील कार्यालयात झालेल्या बैठकीत राज्यस्तरीय आंदोलनाची रूपरेखा ठरविण्यात आली आहे. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयावर विराट मोर्चा काढण्यात येईल.

टॅग्स :महाराष्ट्र