अंगणवाडी सेविकांचा ठिय्या
By Admin | Updated: April 20, 2015 22:35 IST2015-04-20T22:35:58+5:302015-04-20T22:35:58+5:30
मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षण कार्यक्रमात अंगणवाडी सेविकांना काम देऊ नये, अशी मागणी करण्यासाठी आलेल्या अंगणवाडी सेविकांनी सोमवारी अलिबाग

अंगणवाडी सेविकांचा ठिय्या
अलिबाग : मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षण कार्यक्रमात अंगणवाडी सेविकांना काम देऊ नये, अशी मागणी करण्यासाठी आलेल्या अंगणवाडी सेविकांनी सोमवारी अलिबाग तहसीलदार कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला होता. बऱ्याच अवधीनंतर तहसीलदार विनोद खिरोळकर यांनी त्यांना कार्यालयात बोलावल्यानंतर सेविकांनी त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
अंगणवाडी सेविकांना निवडणुकीचे काम देऊ नये, असा सक्षम यंत्रणेचा कोणताही आदेश तुमच्याकडे असल्यास तो दाखवा, तुम्हाला काढलेली नोटीस मागे घेतो, असे खिरोळकर यांनी त्यांना सांगितले.
अंगणवाडी सेविका पोलिओ डोस, हागणदारी मुक्त, पोषण आहार, शाळेचा पट वाढविणे यासह अन्य कामे सातत्याने करीत असतात. एवढी कामे करुनही तुटपुंजे ठरलेले मानधन वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे सरकारची सर्वच कामे करण्यासाठी आम्हालाच का सांगता, असा सवाल त्यांनी केला. काही अंगणवाडी सेविकांचे वय ५५ वर्षांच्या पुढे आहे. त्यामुळे त्यांना काम करता येणार नसल्याचे सांगितले. ज्यांचे वय जास्त आहे त्यांची नावे वगळण्यात येतील, असे खिरोळकर यांनी सांगताच, आमचा निवडणुकीचे काम करण्यालाच विरोध असल्याचे अंगणवाडी सेविकांनी सांगितले.