अंधेरी पश्चिम वार्तापत्र.........

By Admin | Updated: October 4, 2014 22:55 IST2014-10-04T22:55:33+5:302014-10-04T22:55:33+5:30

अंधेरी पश्चिम वार्तापत्र

Andheri West Newspaper ......... | अंधेरी पश्चिम वार्तापत्र.........

अंधेरी पश्चिम वार्तापत्र.........

धेरी पश्चिम वार्तापत्र
............................

अंधेरी पश्चिममध्ये शिवसेना-भाजपात खरी लढाई
अमर मोहिते: मुंबई

युतीमध्ये फूट पडल्याने यंदा अंधेरी पश्चिममध्ये शिवसेना-भाजपात खरी लढाई रंगणार आहे़ काँग्रेसचे विद्यमान आमदार अशोक जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अल्पना पेंटर यांना उमेदवारी मिळाल्याने या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे. तर मनसेचे उमेदवार रईस लष्करिया यांचा जनसंपर्क कमी आहे. त्यात शिवसेनेकडून जयवंत परब व भाजपकडून अमित साटम हे तगडे उमेदवार रिंगणात उतरले आहेत़ परब हे खंदे शिवसैनिक असून साटम यांनी माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मंुंडे यांचे सचिव म्हणून काम केले आहे़ त्यामुळे सरकारविरोधी लाट पाहता भाजप आणि शिवसेना या दोघांमध्येच चुरशीची लढाई होणार हे स्पष्ट झाले आहे. मतविभाजनाचा धोका टाळण्याचा प्रयत्न संभाव्य विजयी उमेदवारासमोरचे मोठे आव्हान राहणार आहे.
मुस्लीम बहुल मतदार असलेल्या या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि मनसे यांच्यात मतांची विभागणी मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. ही विभागणी शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांच्या पथ्यावर पडू शकते.
विशेष म्हणजे २००९ मध्ये या मतदार संघात दुसर्‍या क्रमांकावर शिवसेनेचे विष्णू कोरगांवकर होते. आता जयवंत परब यांना या मतदार संघातून उमेदवारी मिळाली आहे. परब हे क˜र राणे समर्थक होते. त्यांनी सेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला व आता पुन्हा ते सेनेमध्ये परतले. असे असले तरी देखील अंधेरी पश्चिमेत त्यांची मजबूत पकड आहे. परब यांचे पक्षातील स्थानही तेवढेच बळकट आहे़
भाजपकडून अमित साटम हे निवडणूक मैदानात उतरले आहेत़ साटम यांनी माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे सचिव म्हणून काम केले आहे़ अंधेरी पश्चिमेतील पथदिव्यांचा प्रश्न साटम यांनी लावून धरला होता़ प्रशासनाकडून अजून ही मागणी मान्य झालेली नसली तरी त्यामाध्यमातून साटम यांनी चांगली वातावरण निर्मिती केली आहे.
तर दुसरीकडे विद्यमान आमदार जाधव यांच्याबाबत पक्षाअंतर्गतच प्रचंड नाराजीचा सूर आहे़ त्यात आमदार जाधव यांनी ऐन निवडणुका तोंडावर असताना विकास कामांचा केलेला शुभारंभ त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे. अंधेरीचा विकास केल्याचा दावा जाधव करत असले तरी जनतेत मात्र त्यांच्याबद्दलची नाराजी व्यक्त होते. प्रत्यक्षात विकास कामे झाल्याचे दिसत नसल्याचा आरोपही त्यांच्यावर विरोधकांसह जनता करत आहे.
मनसेचे लष्करिया यांचा जनसंपर्क अत्यंत तुरळक आहे़ मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा फायदा काँग्रेसला झाला होता. पण यंदाच्या पंचरंगी लढतीत लष्करिया यांना मिळणार्‍या मतांचा फटका हा अशोक जाधव यांनाच बसण्याची शक्यता आहे. लष्करिया गेल्या निवडणुकीत तिसर्‍या क्रमांकावर होते़ यंदा त्यांचे स्थान तसेच राहिले तरीदेखील प्रस्थापितांना धक्का देण्याची क्षमता मात्र त्यांच्यामध्ये नक्कीच आहे. त्यात अंधेरीकरांना मनसेकडे आकर्षित करेल, असा एकही उपक्रम लष्करिया यांनी राबवलेला नाही़ केवळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचे मोठे-मोठे होर्डिंग लावून त्यांनी चर्चेत राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला़
राष्ट्रवादीच्या उमेदवार अल्पना पेंटर यांनाही येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोधच आहे़ शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात होते. राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्ष बाबण्णा कोशळकर हे सर्वांत आघाडीवर असताना ऐनवेळी पेंटर यांना थोपवण्यात आल्याचा राग कार्यकर्त्यांच्या मनात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कोशळकरांचे कार्यकर्ते अल्पना पेंटर यांच्यासाठी किती काम करतील, हा प्रश्नच आहे.
या मतदार संघात डी़ एऩ नगर, आंबोली, मनीष नगर, वर्सोवा लिंक रोड, जुहू लेन व ईर्ला हे महत्त्वाचे भाग येतात़ अंधेरी पश्चिमेत अल्पसंख्यांक मतदारांसह मराठी मतदार देखील मोठ्या संख्येने आहेत. या विभागांच्या समस्याही अनेक वर्षांपासून प्रलंबितच आहेत़ झोपडप˜यांचा पुनर्विकास, पायाभूत सुविधांचा अभावमुळे येथील जनता त्रस्त झाली आहे़ त्यात सेना व भाजपने या मतदारसंघात तगडे उमेदवार दिल्याने येथे खरी लढाई आता शिवसेना आणि भाजपा या दोन प्रमुख पक्षांमध्ये होण्याची शक्यता आहे.
...............................
(चौकट)
एकूण मतदार - ४ लाख
मुस्लिम -६० टक्के
मराठी- १५ टक्के
गुजराती - ५ टक्के
अन्य - २० टक्के
...............................

Web Title: Andheri West Newspaper .........

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.