Join us  

अंधेरीकरांची ८ वर्षांनंतर वाहतूककोंडीतून सुटका; अखेर पूर्वेकडील भुयारी मार्ग खुला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 10:51 AM

अंधेरी पूर्वेतील पारशी  पंचायत (पंप हाउस) येथील भुयारी मार्ग तब्बल ८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

मुंबई :  अंधेरी पूर्वेतील पारशी  पंचायत (पंप हाउस) येथील भुयारी मार्ग तब्बल ८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने २७ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या भुयारी मार्गाचे लोकार्पण केले आहे. त्यामुळे अंधेरीतील नागरिकांची वाहतूककोंडीतून सुटका झाली आहे. 

अंधेरी रेल्वेस्थानक पश्चिम व पूर्वेला जाण्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्गावरून भुयारी मार्गातून पंप हाउस, शेरे पंजाब, मेघवाडी, महाकाली लेणी, मजास या ठिकाणी जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. येथे रोज सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मोठी वाहतूककोंडी होत होती. या भुयारी मार्गात दिवंगत माजी नगरसेविका श्वेताली पाटील यांचा अपघात झाला होता. त्यामुळे ते प्रकरण चिघळले होते. या भुयारी मार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी स्थानिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार ठाकरे यांच्या हस्ते १७ जानेवारी २०१६ मध्ये या भुयारी मार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामाचे भूमिपूजन झाले. पश्चिम द्रुतगती महामार्गावर जुन्या भूमिगत मार्गाला लागून दुसरा भुयारी मार्ग बांधण्यात आला. १३ कोटी रुपये खर्चून हे काम करण्यात आले. 

भुयारी मार्गाचे लोकार्पण शिंदे गटाचे आ. रवींद्र वायकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आ. ऋतुजा लटके, माजी नगरसेवक सदानंद परब, प्रवीण शिंदे, स्वप्नील टेंबवलकर व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :मुंबईरवींद्र वायकरअंधेरी पूर्वएमएमआरडीए