अंधेरी, जुहूत १२५ कुपोषित बालके
By Admin | Updated: August 24, 2014 23:01 IST2014-08-24T21:03:57+5:302014-08-24T23:01:00+5:30
अंधेरी-जुहू परिसरात ६ वर्षांखालील सुमारे १२५ कुपोषित बालके असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

अंधेरी, जुहूत १२५ कुपोषित बालके
अंधेरी: अंधेरी-जुहू परिसरात ६ वर्षांखालील सुमारे १२५ कुपोषित बालके असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या बालकांची आरोग्य तपासणीही करण्यात आली आहे. भवन्स कॉलेज जवळील जानकीदेवी सभागृहात या कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या बालकांसह त्यांच्या पालकांनी या तपासणीसाठी गर्दी केली होती. मनसे नेते रईस लष्करिया यांनी या कुपोषित बालकांना एक वर्षासाठी दत्तक घेतले आहे. अंगणवाडी सदस्यांना कुपोषित बालकांच्या वजन तपासणीसाठी सुमारे ३०० वजन मशीन देखील त्यांनी उपलब्ध करून दिले आहेत.
शासनाच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे कुपोषित बालकांसाठी वेळोवेळी तपासणी करण्यात येते. झोपडप्यांमध्ये जाऊन महिन्यातून ३ ते ४ वेळा वजनही घेण्यात येते. या बालकांना मोफत औषधांचा पुरवठा देखील करण्यात येतो. या विभागात पूर्वी सुमारे ३०० कुपोषित बालके होती. ती संख्या आता १२५ वर आल्याचे अंधेरी १ आणि २च्या बालकल्याण प्रकल्प अधिकारी प्रेमा घाटगे यांनी सांगितले. बालरोग निदानतज्ज्ञ डॉ. उमरसिंग वळवी यांनी कुपोषित बालकांची तपासणी केली. त्यांना मोफत ओषध आणि डी जीवनसत्त्वयुक्त व्हीटॅमिनच्या गोळ्या देखील देण्यात आल्या.