Join us

गोखले-बर्फीवाला पुलाची जोडणी अखेर सुरू; जूनअखेरपर्यंत पूल खुले करण्याचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 10:01 IST

अंधेरीतील गोखले उड्डाणपूल आणि बर्फीवाला पुलाच्या जोडणीला अखेर रविवारी सुरुवात झाली.

मुंबई : अंधेरीतील गोखले उड्डाणपूल आणि बर्फीवाला पुलाच्या जोडणीला अखेर रविवारी सुरुवात झाली. ‘आयआयटी मुंबई’ने ८ एप्रिल रोजी या जोडणीच्या संरेखनाचा अंतिम अहवाल सादर केला होता. त्यानुसार या जोडणीसाठी चारऐवजी दोन स्तंभ उंचावण्यात येणार आहेत. त्यामुळे पूल जोडणीचा कालावधी कमी होऊन तो लवकर खुला करण्यासाठी प्रयत्न केले जातील. येत्या जूनअखेर दोन्ही पुलांची जोडणी करून ते वाहतुकीसाठी सुरू करण्याचा पालिकेचा प्रयत्न असणार आहे.  

आमदार अमित साटम यांच्या माहितीनुसार, सध्या काम करणाऱ्या कंत्राटदाराकडूनच नवीन काम केले जाणार आहे. गोखले-बर्फीवाला पुलाच्या उत्तरेकडील जोडणीसाठी तीन ते चार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सुरुवातीला पालिकेकडून या पुलाच्या पृष्ठभागाचे काम सुरू करण्यात आले आहे. तर, उत्तरेकडील पुलाच्या संपूर्ण जोडणीचे काम पूर्ण करण्यासाठी ६० ते ९० दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

उत्तरेकडचे झाले, दक्षिणेचे काय? 

१) गोखले पुलाच्या पुनर्बांधणीत, बर्फीवाला पुलाला गोखले पूल जोडून जुहूपर्यंतच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवला जाणार होता. मात्र, काही अभियांत्रिकी दोषांमुळे गोखले पुलाची उंची २.८ मीटरने अधिक वाढल्याने दोन पूल जोडण्याचा प्रयत्न फसला. या पार्श्वभूमीवर पालिकेने या समस्येवर उपाय सुचवण्यासाठी ‘आयआयटी’ व ‘व्हीजेटीआय’चा सल्ला मागितला होता. त्यानुसार पूल जोडणीसाठी आता उत्तरेकडचे काम सुरू करण्यात आले आहे. 

२) दुसऱ्या गर्डरसाठीचे साहित्य हळूहळू पोहोचत आहे. दुसऱ्या बाजूच्या गर्डरसाठी लागणाऱ्या ३२ स्पॅन पैकी जवळपास ५ स्पॅन मुंबईत पोहोचले असून आता त्यांचे एकत्रीकरण करून कामाला सुरुवात केली जाणार आहे. मात्र, उत्तरेप्रमाणेच दक्षिण बाजूला देखील जोडणीची हीच समस्या पुढे येणार आहे. त्यासाठी पालिका काय करत आहे? तिथेही मार्गिका खुली केल्यानंतर जोडणीचे काम हाती घेणार का, असा प्रश्न  नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाअंधेरी