Join us  

Andheri Bypoll : अंधेरी पोटनिवडणुकीत कोण जिंकणार?

By अतुल कुलकर्णी | Published: October 17, 2022 6:44 AM

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक उद्धव ठाकरे गटाने जिंकली तर त्याचे आणि भाजपने जिंकली तर काय परिणाम होतील..?

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना जिंकणार की भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलणार ? यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. निवडणूक जवळ येईल तसा सट्टा बाजारही यात उतरला तर आश्चर्य नाही. या निवडणुकीच्या निमित्ताने काही प्रश्न चर्चेत आहेत. सुरुवातीलाच उल्लेख केलेल्या प्रश्नांसह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ही निवडणूक का लढवली नाही, यावरूनही त्यांना ट्रोल केले जात आहे.

एकनाथ शिंदे गटाने ही निवडणूक लढवली नाही. त्याची अनेक कारणे समोर येत आहेत. जर ही निवडणूक त्यांनी ढाल- तलवार या चिन्हावर लढवली असती आणि त्यात शिंदे गटाचा पराभव झाला असता तर त्याचे पडसाद राज्यभर उमटले असते. तो धोका आता लगेच एका पोटनिवडणुकीपुरता घेण्याची शिंदे गटाची मानसिकता नव्हती. अजूनही शिंदे गटाकडे शिवसेनेचे म्हणावे तेवढे नगरसेवक आलेले नाहीत. अशावेळी या निवडणुकीत पराभव झाला तर महापालिकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नगरसेवक आपल्याकडे येण्यासाठी तयार होतील का, असेही शिंदे गटाला वाटत असावे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचा होणारा पराभव आपल्यासाठी अडचणीचा ठरेल, असे शिंदे गटाचे गणित असावे. त्यामुळेच शिंदे गट आणि भाजपने ठरवून भाजपचा उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला असावा.

दुसरीकडे शिंदे गटाला आधी स्वतः उभे राहायचे आहे. त्यामुळे अचानक एक विधानसभा निवडणूक लढवायची आणि त्यात पराभव पत्करायचा हे अडचणीचे होईल, हा विचार शिंदे गटाने केला असावा. त्यापेक्षा भाजपचा उमेदवार उभा राहिला आणि तो पराभूत जरी झाला तरी फारसा फरक पडणार नाही. भाजपकडे असे धक्के पचविण्याची ताकद आहे. जी शिंदे गटाकडे आजतरी नाही. मध्यावधी किंवा छोट्या

निवडणुकांकडे टेस्ट केस म्हणून पाहण्याची भाजपची सवय व रणनीती आहे. भाजपची कोणतीही कृती विचार केल्याशिवाय होत नाही. त्यामुळे आपला उमेदवार पराभूत जरी झाला, तरी त्यातून काय काढून घ्यायचे, हे त्यांना कळते. अन्य पक्षांकडे हा धोरणीपणाही नाही आणि तेवढा विचारही नाही. या पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना जिंकली तर त्यांना चोहोबाजूंनी दाटून आलेल्या संकटात दिलासा मिळेल. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन ही निवडणूक शिवसेनेने जिंकली है कायम त्या यशासोबत चिटकले जाईल.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विजय शिवसेनेला दिलासा देणारा असेल खरा; पण महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून जास्त जागांची मागणी केली जाईल. आमच्यामुळे अंधेरीची जागा निवडून आली हे काँग्रेस कायम शिवसेनेला ऐकवत राहील. या सगळ्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा भाजपकडून पुढे रेटला जाईल तो म्हणजे, ठाकरे यांच्या शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत तडजोड करून हिंदुत्वाचा मुद्दा सोडून दिला. त्याचेही उत्तर ठाकरे गटाला तयार ठेवावे लागेल.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत जवळपास दोन लाख ८० हजार मतदार आहेत. त्यापैकी एक लाख मराठी आहेत. ३८ हजार हिंदी भाषिक तर ३७ हजार गुजराती आहेत. मुस्लिम मतांची संख्या ३५ हजारांच्या घरात असून खिश्चन मतदार १८ हजार आहेत. त्यामुळे कोणत्या एका समाजाचा पगडा या मतदारसंघावर नाही. गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाची टक्केवारी पाहिली तर तीदेखील अत्यंत कमी आहे. २००९ मध्ये ४९ टक्के, २०१४ मध्ये ५३ टक्के आणि २०१९ मध्ये अंदाजे ४६ टक्के मतदान झाले होते. मुस्लिम मतदार यावेळी शिवसेनेसोबत जाईल, असे सांगितले जात असले तरी गुजराती मतदान एकगठ्ठा मुरजी पटेल यांना मिळू शकते. मराठी मतांमध्ये विभागणी होईल. उत्तर भारतीय मतदान मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.

जाता जाता २०१४ मध्ये मुरजी पटेल यांना हाताशी धरून शिवसेनेने तत्कालीन काँग्रेसचे उमेदवार सुरेश शेट्टी यांच्या विरोधात प्रचार केला होता. शेट्टींना पाडण्यासाठी आम्हाला पटेल यांचा फायदा झाल्याची कबुली देणारे अनिल परब आणि अन्य नेत्यांचे व्हिडीओज आता व्हायरल होत आहेत. सुरेश शेट्टी यांचा त्यावेळी पराभवही झाला होता. त्यावेळी ज्या पटेल यांची शिवसेनेने मदत घेतली होती त्याच मुरजी पटेल यांना पराभूत करण्यासाठी आता मात्र सुरेश शेट्टी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला मदत करावी, असे ठाकरे यांच्या शिवसेनेला वाटते. काळाचा महिमा अगाध असतो, असे म्हणतात

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीस