...अन् त्या ठरल्या ‘लेडी जाएंट’!
By Admin | Updated: October 20, 2014 03:03 IST2014-10-20T03:03:48+5:302014-10-20T03:03:48+5:30
विधानसभेत महिलांचे प्रतिनिधित्व अपवादानेच दहा टक्क्यांच्या पुढे गेलेले आहे.

...अन् त्या ठरल्या ‘लेडी जाएंट’!
स्नेहा मोरे, मुंबई
विधानसभेत महिलांचे प्रतिनिधित्व अपवादानेच दहा टक्क्यांच्या पुढे गेलेले आहे. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे स्त्रियांना स्वतंत्र ‘इलेक्टिव्ह मेरिट’ नाही, स्त्री उमेदवार म्हणजे जोखमीच्या उमेदवार, असे मानले जाते. मात्र असे असूनही विधानसभा निवडणुकीत काही धक्कादायक निकाल समोर आले असून मुंबई शहर उपनगरातील काही मतदारसंघात पुरुष उमेदवारांना ‘चीतपट’ करत महिला उमेदवार लेडी जाएंट ठरल्या आहेत.
पश्चिम उपनगरातील दहिसर येथील मतदारसंघात भाजपाच्या मनीषा चौधरी यांनी सेनेच्या विनोद घोसाळकर यांना ३८ हजार ५७८ मतांनी मागे टाकत विजय मिळवला आहे. या मतदारसंघात घोसाळकरांवर नाराजी असलेली ‘दुर्गाशक्ती’ एकवटून त्यांच्याच विरोधात उभी ठाकली होती. या मतदारसंघात भाजपाच्या मनीषा चौधरी यांनी ७७ हजार २२१ मते मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले.
तर गोरेगावमध्ये सेनेचे दिग्गज नेते सुभाष देसाई यांना ‘काँटे की टक्कर’ देत भाजपाच्या विद्या ठाकूर यांनी प्रथम स्थान मिळविले. देसाई यांना ४ हजार ७५६ मतांनी मागे टाकत ६३ हजार ६२९ मते मिळवून विजय पटकावला.
धारावीत पुन्हा एकदा काँग्रेसच्या विद्यमान आमदार वर्षा गायकवाड यांनी ४७ हजार ७१८ मताधिक्याने विजय मिळवला आहे. तर
सेनेचे बाबूराव माने यांना १५
हजार ३२८ मतांनी मागे टाकत यशाचे शिखर सर केले. याच मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार दिव्या
ढोले यांनीही २० हजार ७६३ मते मिळवून लढतीला रंगत
आणली. शिवडी विधानसभा मतदारसंघातही सेना-मनसेच्या चुरशीच्या लढतीत भाजपाच्या शलाका साळवी यांनी २१ हजार ९२१ मते मिळविली. तर भायखळा मतदारसंघातही शिवसेना
पुरस्कृत अभासेच्या उमेदवार गीता गवळी यांनी २० हजार ८९५ मते मिळविली. कुलाबा मतदारसंघातही काँग्रेसच्या ज्येष्ठ उमेदवार अॅनी शेखर यांनीही सेना-भाजपाच्या अटीतटीच्या लढतीतही २० हजार ४१० मते मिळविली.