... आणि पोलिसांनीच त्याला लुटले!
By Admin | Updated: April 20, 2015 17:07 IST2015-04-20T16:59:38+5:302015-04-20T17:07:02+5:30
मुंबई अहमदाबाद हायवेवर एका व्यक्तीस चार पोलिसांनी लुटल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

... आणि पोलिसांनीच त्याला लुटले!
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - हायवेवर प्रवास करीत असताना गाडी अडवून चोरांनी लुटले तर पीडित व्यक्ती पोलीस ठाण्याकडे धाव घेवून पोलिसांकडे न्याय मागताना आपण अनेकदा पाहीले आहे पण मुंबई अहमदाबाद हायवेवर एका व्यक्तीस चार पोलिसांनी लुटल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. चार पोलिसांनी या व्यक्तीस केवळ मारहाण केली नाही तर त्याच्याकडील २५ हजारांची रोकडही हिसकावली व तेथून पलायन केले.
मदनकुमार महातो हे सिल्वासाहून मुंबई विमानतळाकडे जात असताना चारोटीजवळ येताच ट्रॅफिक हवालदार असलेल्या चार पोलिसांनी महातो यांची गाडी अडवली. राज्यात गुटखाबंदी असताना तू गुटखा विकतो अशी धमकी देवून पोलिसांनी महातोला मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाण केल्यानंतर बळजबरी महातोला जवळच्या एटीएममध्ये नेवून २५ हजार रुपये काढायला सांगितले व २५ हजार रुपयांची रोकड घेवून तेथून पसार झाले. या सर्व प्रकारानंतर महातो यांनी कासा पोलीस ठाण्यात रितसर या चार पोलिसांविरुध्द तक्रार केली. पोलिसांनी तपास करून राजू चव्हाण, सुरेश राठोड, राजू शेख आणि जितेंद्र चौगुले या चार पोलिसांना अटक केली. हे सर्वजण ट्रॅफिक ब्रान्च वसई विभागातील पोलिस आहेत. चारही पोलिस आरोपींना २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती कासा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी रवींद्र मगर यांनी दिली.