Join us  

अन् जुहू बीच चकाचक झाला, 5 दिवसात काढला 400 टन कचरा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 6:54 PM

जुहू बीचवरील कचऱ्यात प्लॅस्टिक बॉटल्स व प्लॅस्टिक पिशव्यांचा मोठा भरणा मोठा होता.

मनोहर कुंभेजकर

मुंबई - गेल्या 8 दिवसांपासून जुहू बीचच्या जुहू कोळीवाड्यात सुमारे 400 टन इतका कचरा जमा झाला होता. पावसाळ्यात समुद्र हा खवळलेला आहे. त्यातच आलेल्या वायू वादळाने हा कचरा व मोठ्या प्रमाणात प्लास्टीक समुद्र किनाऱ्यावर सुमद्राकडून फेकले जात आहे. त्यामुळे गेल्या 8 दिवसात जुहू बीचवर सुमारे 400 टन इतका कचरा जमा झाला होता. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक व इतर कचरा जमा झाला होता. मात्र, आता बीएमसीकडून या जुहू बीचवर साफसफाई करण्यात आली आहे. 

जुहू बीचवरील कचऱ्यात प्लॅस्टिक बॉटल्स व प्लॅस्टिक पिशव्यांचा मोठा भरणा मोठा होता. जुहू बीचची झाली कचराकुंडी असे वृत्त लोकमत ऑनलाइन व आजच्या लोकमतमध्ये कचऱ्याच्या छायाचित्रासह पसिद्ध झाले होते. लोकमतच्या वृतांची दखल घेऊन आज सायंकाळपर्यंत येथील गेली 5 दिवस साचलेला 400 टन कचरा काढण्यात आला अशी माहिती जुहू बीचचे स्वछता करणारे कॉट्रॅक्टर स्पेक्ट्रॉन इंजिनियरिंग कंपनी प्रा लिमिटेडच्या अधिकाऱ्याने लोकमतशी बोलतांना दिली. अंधेरी पश्चिम येथील भाजपाचे आमदार अमित साटम व के पश्चिमचे प्रभाग समिती अध्यक्ष अनिस मकवानी यांनी सुद्धा जातीने लक्ष घातले.

जुहू बीचच्या स्वच्छतेचे करोडो रुपयांचे कंत्राट घेतलेल्या स्पेक्ट्रॉन या कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सी गार्डिंयन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील कानोजिया यांनी लोकमतशी बोलताना केला होता. आज लोकमतच्या दणक्याने बीच चकाचक झाला, अशी माहिती त्यांनी दुपारी बीचची पाहणी केल्यावर दिली. लोकमतच्या दणक्याने सध्या तरी येथील कचऱ्याची समस्या सुटली असली तरी, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात बीचवर जमा होणारा कचरा सदर कंत्राटदाराने युद्धपातळीवर काढला गेला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

स्पेक्ट्रॉन इंजिनियरिंग कंपनी प्रा लिमिटेडच्या अधिकाऱ्याने लोकमतशी बोलतांना सांगितले की, जुहू बीचवरील सी प्रिन्सेस हॉटेल ते जुहू कोळीवाडा येथील साचलेला सुमारे 450 टन कचरा हा गेली 5 दिवस समुद्राला भरती असल्याने गेली 5 दिवस दोन शिफ्टमध्ये एकूण 120 कामगार तैनात करून आज सायंकाळी बीच चकाचक केला. त्यासाठी 3 बीच क्लिनिग मशिन्स, 2 कॉम्प्ट्रकर, 2 ट्रॅकटर्स विथ ट्रॉली, 2 जेसीबी, 2 हायवा आदी मशिनरी वापरून येथील कचरा युद्धपातळीवर काढण्यात आला. या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिक पिशव्या व प्लॅस्टिक बाटल्या यांचाच भरणा होता.

 

टॅग्स :मुंबईकचरा प्रश्नसागरी महामार्ग