...आणि चर्चगेट स्थानक परिसर झाला फेरीवालामुक्त

By Admin | Updated: March 31, 2015 01:50 IST2015-03-31T01:50:43+5:302015-03-31T01:50:43+5:30

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्थानके फेरीवालामुक्त करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला नुकतेच आदेश दिले आणि हे आदेश देऊनही फेरीवालामुक्त स्थानके झाली नाहीत

... and the Churchgate Station area has become a neighborhood-free shop | ...आणि चर्चगेट स्थानक परिसर झाला फेरीवालामुक्त

...आणि चर्चगेट स्थानक परिसर झाला फेरीवालामुक्त

मुंबई : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्थानके फेरीवालामुक्त करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला नुकतेच आदेश दिले आणि हे आदेश देऊनही फेरीवालामुक्त स्थानके झाली नाहीत. मात्र काही वेळेसाठी का असेना गजबजलेल्या चर्चगेट स्थानकाचा परिसर सोमवारी फेरीवालामुक्त झाल्याचे दिसून आले. मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्या हस्ते क्षयरोगविषयक संदेश दाखविणाऱ्या लोकलचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. आयुक्त येणार असल्याने त्याअगोदरच पालिका कर्मचारी आणि पोलिसांकडून त्वरित फेरीवाला हटाव मोहीम घेण्यात आली आणि स्थानकाबाहेर येणाऱ्या प्रवाशांना थोड्या वेळासाठी दिलासा दिला.
मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने क्षयरोगाबाबत जनजागृती व्हावी आणि त्याच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने ‘टीबी हारेगा, देश जितेगा’ हे अभियान राबविले जात आहे. या अभियानाचा भाग म्हणून क्षयरोगविषयक संदेश दाखविणाऱ्या एका लोकलचा शुभारंभ पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्या हस्ते सोमवारी करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार चर्चगेट रेल्वे स्थानकावर आयोजित एका छोटेखानी समारंभादरम्यान दुपारी २.३३ वाजता बोरीवलीला जाणाऱ्या लोकलला हिरवा झेंडा दाखवून संदेशात्मक लोकलचा शुभारंभ करण्यात येणार होता. आयुक्त दुपारी अडीच वाजता येणार असल्याने एक तास अगोदर चर्चगेट स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांना हटविण्यात आले. चर्चगेट स्थानकातील ईरॉसच्या दिशेने असणाऱ्या सब-वेत फेरीवाले मोठ्या प्रमाणात आहेत. यातील फेरीवाले तर आपल्या स्टॉलची हद्द सोडून टेबल-खुर्च्या मांडून व्यवसाय करताना दिसतात. तर सब-वेच्या दुसऱ्या दिशेने (आतील बाजूस-फॅशन स्ट्रीटच्या दिशेने) असणाऱ्या फेरीवाल्यांनी मोठा पसारा मांडलेला असतो. सब-वेबाहेर तर यापेक्षा भयानक परिस्थिती असते. फेरीवाल्यांनी चोहोबाजूंनी विळखा घातलेला असतानाही पालिका आणि पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र सोमवारी पालिका आयुक्तच येणार असल्याने त्यांचे लक्ष जाऊ नये यासाठी पालिका कर्मचारी आणि पोलिसांनी फेरीवाल्यांनाच हटवून टाकले. त्यामुळे चर्चगेट स्थानक परिसर हा फेरीवालामुक्त होताच प्रवाशांकडूनही आश्चर्य व्यक्त केले जात होते. पालिका आयुक्त दुपारी येताच त्यांच्याकडून या लोकलला हिरवा कंदील दाखवून शुभारंभ करण्यात आला. अर्धा तास स्थानकात थांबल्यानंतर आयुक्त तेथून जाताच फेरीवाल्यानी काही मिनिटांतच आपले बस्तान पुन्हा बसविण्यास सुरुवात केली. त्यामुळे प्रवाशांकडून आश्चर्य व्यक्त केले जात होते. (प्रतिनिधी)

Web Title: ... and the Churchgate Station area has become a neighborhood-free shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.