...अन् बाबासाहेबांनी शहापूरच्या शेटजींना सोडविले!
By Admin | Updated: April 14, 2015 01:59 IST2015-04-14T01:59:28+5:302015-04-14T01:59:28+5:30
स्वातंत्र्यपूर्व काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिली व्यवसायाच्या निमित्ताने शहापूरला दोन दशके भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास लाभला.

...अन् बाबासाहेबांनी शहापूरच्या शेटजींना सोडविले!
भरत उबाळे ल्ल शहापूर
स्वातंत्र्यपूर्व काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिली व्यवसायाच्या निमित्ताने शहापूरला दोन दशके भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास लाभला. शहापूरकरांसाठी ऐतिहासिक पर्व ठरलेला हा काळ भूतकाळाच्या बंदिस्त सुवर्ण कुपीतून आजही दरवळतोच आहे. येथील विशेषत: काही दलितेतर कुटुंबांनी त्यांच्या आयुष्यात सुवर्णक्षण ठरलेला बाबासाहेबांचा सहवास पिढ्या बदलल्या तरी हृदयापल्याड जपला आहे.
१९३० च्या काळातले व्यापारी तसेच सावकार असलेले चंदुलाल स्वरूपचंद शहा यांच्याविरु द्ध बेकायदा शस्त्र व स्फोटक पदार्थ बाळगले म्हणून इंडियन पिनल कोडमधील आर्म अॅक्टनुसार इंग्रज सरकारने गुन्हा नोंदविला होता. हे प्रकरण अंतिम निर्णयासाठी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असतानाच शहा यांचे वकील प्रभाकर रेगे यांनी या गुह्यातून सुटका करणे माझ्या आवाक्यात नाही असे सांगितले. शहा यामुळे प्रचंड हादरून गेले होते. हे प्रकरण सामान्य वकिलाच्या आवाक्यातले नसून, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना दादर येथे जाऊन भेटा; ते नक्की मार्ग काढतील, असा सल्ला रेगे यांनी दिला.
दादरचे तिकीट हीच फी !
सावकार शहांनी बाबासाहेबांची दादरच्या घरी भेट घेतली. चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व व माणसे ओळखण्याची अद्भुत नजर लाभलेल्या बाबासाहेबांनी काय काम आहे ते दोनच मिनिटांत सांगा. जास्त वेळ घेऊ नका, असे बजावले. शहांनी दोनच मिनिटांत संपूर्ण हकिकत सांगितली. पुढची तारीख किती आहे, असे विचारून फीबाबत काहीच न बोलता नंतर बघू, एवढेच सांगून बाबासाहेबांनी येण्याचे कबूल केले.
बाबासाहेबांनी ठाणे सत्र न्यायालयात आर्म अॅक्ट प्रकरणी न्यायाधीशांसमोर फक्त दोनच मिनिटे युक्तिवाद केला. ते ऐकून न्यायाधीशांनी शहा यांना तुम्हाला सोडण्यात आले आहे. तुम्ही जाऊ शकता, असे म्हणून निर्दोष सोडले. आनंदात असलेले शहा बाबासाहेबांसाठी काहीही करायला तयार होते. परंतु कुठलीही अवास्तव फी न घेता फक्त दादरच्या परतीचे लोकलचे तिकीट काढून द्या, एवढेच बाबासाहेबांनी शहांना सांगितले.
१९३० ते १९३८ या काळात शहापूर न्यायालयात आंबेडकरांनी वकील म्हणून अनेक केसेस चालवल्या. त्याच्या नोंदी आजही न्यायालयात पाहायला मिळतात. शहापूर न्यायालयाला डॉ. आंबेडकरांच्या वकिलीची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. शिवाय त्या निमित्ताने शहापूर, वासिंद, कसारा, किन्हवलीमधील ज्या कुटुंबांना बाबासाहेबांचा सहवास लाभला, ती कुटुंबे सुवर्ण क्षणांची सोबती झाली.