गुळसुंदेतील यादवकालीन सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर
By Admin | Updated: August 10, 2014 23:27 IST2014-08-10T23:26:10+5:302014-08-10T23:27:35+5:30
श्रावण महिना म्हटले की, शिवशंभोच्या दर्शनासाठी मंदिरात रांगा लागतात. सणांच्या, व्रतवैकल्याच्या या महिन्यात भक्तांना शिवमंदिराची ओढ लागते.

गुळसुंदेतील यादवकालीन सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर
रसायनी : श्रावण महिना म्हटले की, शिवशंभोच्या दर्शनासाठी मंदिरात रांगा लागतात. सणांच्या, व्रतवैकल्याच्या या महिन्यात भक्तांना शिवमंदिराची ओढ लागते. ग्रामीण भागातही श्रावणी सोमवारी भक्तांची मंदिरात गर्दी असते. खेड्यातून काही प्राचीन शिवमंदिरे आहेत. त्यातीलच एक म्हणजे रसायनी परिसरातील पाताळगंगा नदीकिनारी असलेले यादवकालीन सिद्धेश्वराचे गुळसुंदे येथील प्राचीन मंदिर.
काळ्या पाषाणातील हे सुंदर मंदिर हेमाडपंथी दक्षिण शैलीत पूर्ण चुन्यामध्ये बांधलेले आहे. भव्य घुमट, पुढे सभामंडप, आंतर भागात शिल्प, चौकटीवर वेलपती कमलाकारांची संकल्परचना, भिंतीत समई दीपांसाठी महिरपी कोनाडे, भव्य नंदी शिल्प, बाहेरील पायऱ्यांजवळ यादव विजयाची प्रतिकरूप हत्ती शिल्पे समोरून वाहणारी पाताळगंगा नदी, मंदिरासमोर भव्य घाट व पाताळगंगा नदीचा रमणीय दिसणारा दुतर्फा काठ, एक भव्य, मनाला शांतता देणारे हे मंदिर पनवेल तालुक्यात गुळसुंदे गावी आहे.
येथे येण्यासाठी कोकण रेल्वेने आपटा स्थानकावर उतरून दीड दोन किमीवर हे मंदिर आहे. पनवेल येथून एसटीने दांड मोहोपाडा मार्गाने आणि सावळा मार्गानेही आपटा, पेण जाणाऱ्या बसेसने गुळसुंदे बसने गुळसुंदे येथे उतरता येते. या रमणीय खेड्यात लॉजिंग बोर्डिंग नाही. स्थानिक नागरिकांना विनंती केल्यास अल्पदरात भोजन व निवासाची सोय होवू शकते. प्रत्येकवर्षी भक्तांची गर्दी वाढत आहे.