समर्थ साधनेची अलौकिक प्रचिती अनितामाई!
By Admin | Updated: April 19, 2015 01:40 IST2015-04-19T01:40:40+5:302015-04-19T01:40:40+5:30
डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पत्नी अनितामाई धर्माधिकारी यांच्या देहावसानामुळे धर्माधिकारी कुटुंबात खऱ्या अर्थाने एक पोकळी निर्माण झाली आहे.

समर्थ साधनेची अलौकिक प्रचिती अनितामाई!
-ज्येष्ठ निरुपणकार तथा महाराष्ट्र सरकारचे स्वच्छता राजदूत डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पत्नी अनितामाई धर्माधिकारी यांच्या देहावसानामुळे धर्माधिकारी कुटुंबात खऱ्या अर्थाने एक पोकळी निर्माण झाली आहे. निरुपणाची अनन्यसाधारण परंपरा असलेल्या धर्माधिकारी कुटुंबाच्या समर्थ सेवेच्या कार्यात अनितामाई स्वत: तन्मयतेने सक्रिय झाल्या आणि दासबोधाच्या निरुपणात त्यांनी स्वत:ला सामावूनच घेतलं. परिणामी अनितामाई यांचे संपूर्ण आयूष्य म्हणजे समर्थ साधनेची अलौकिक प्रचितीच होते. अनिताताई या धर्माधिकारी कुटुंबाच्या प्रभावी आणि यशस्वी समन्वयक होत्या़ परिणामी त्या कुटुंबाच्या जशा आधारवड होत्या तशाच लाखो दासभक्तांच्या त्या मायमाऊली देखील होत्या. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड या गावातील अत्यंत सुसंस्कृत व मध्यमवर्गीय खंडकर कुटुंबात जन्म झालेल्या अनितामार्इंचा स्वभाव बालपणी अबोल, प्रेमळ, सर्वांशी संवाद साधणारा असा होता, असे अनितामार्इंच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना त्यांचे बंधू विजय खंडकर यांनी सांगीतले. आमचे वडील शेतकरी होते. त्या वेळी शेतीही खूप होती. शेतीच्या कामात त्यांना प्रचंड रुची होती. विविध झाडे, त्यांचे आयुर्वेदिक महत्त्व याची जाणही त्यांना होती.
मंडणगडमध्येच प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर अनितामार्इं रेवदंड्यामधील निरुपणाची अनन्यसाधारण परंपरा जोपासलेल्या आणि त्याच माध्यमातून समाजपरिवर्तनाची प्रक्रिया घडवून आणणाऱ्या धर्माधिकारी कुटुंबातील दत्तात्रेय ऊर्फ आप्पासाहेब यांच्याशी मार्च १९७४ मध्ये विवाहबद्ध झाल्या आणि त्यांना जीवनाची नवी दिशाच गवसली.
मुखोद्गत दासबोध आणि धार्मिक परंपरा - संस्कारांचे शास्त्रशुद्ध ज्ञान
दासबोध निरुपणातील भाग त्यांना मुखोद्गत होता. त्यांना भेटायला ज्या वेळी महिला यायच्या त्या वेळी त्यांना दासबोधांमधील श्लोकांच्या माध्यमातून त्या मार्गदर्शन करायच्या आणि ते पाहताना, अनुभवताना मोठा आनंद वाटायचा, असा अनितामार्इंचा एक महत्त्वपूर्ण गुण विजयभाऊंनी आवर्जून सांगितला. धार्मिक परंपरा आणि संस्कार यातील शास्त्रशुद्ध ज्ञान त्यांच्याकडे होते. आमच्याकडे कोणतेही धार्मिक कार्य असले की त्या आप्पासाहेबांसोबत आवर्जून सहभागी होत असत. अलीकडेच माझ्या कन्येच्या विवाहावेळी त्यांची प्रकृती बरी नसतानाही त्या आवर्जून उपस्थित राहिल्या. लग्नातील सारे विधी शास्त्रशुद्ध पद्धतीने आमच्याकडून करवून घेतले ही आठवण तर आम्ही कधीही विसरू शकत नाही, असा स्मृतीक्षण विजयभाऊंनी पुढे सांगितला.
यशस्वी कुटुंब समन्वयक
ज्येष्ठ निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या निरुपणातून सामाजिक परिवर्तनाच्या अलौकिक विचारातून त्यांची वैचारिक बैठक निश्चित झाली, तर सासूबाई शारदामाता यांच्याकडून त्यांनी कौटुंबिक समन्वयाचे धडे घेतले. डॉ. नानासाहेब त्या वेळी निरुपण व अन्य कार्यक्रमांच्या निमित्ताने देशभरात दौऱ्यांवर असताना त्यांच्यासमवेत त्यांचे पती ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब देखील असायचे. त्या वेळी संपूर्ण कुटुंबाचा समन्वय सासूबाई शारदामाता यांच्या माध्यमातून राखला जात असे आणि त्याच कौटुंबिक समन्वयाची दीक्षा अनितामार्इंनी शारदामातांकडून यशस्वीरीत्या आत्मसात केली.
समर्थ निरुपणाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येकाच्या मनात सुसंस्कारांची बिजे पेरून सशक्त वैचारिक बैठकीवर आधारित शिस्तबद्ध एकसंध आणि सक्षम समाज निर्मितीच्या प्रक्रियेतून ‘हे विश्वची माझे कुटुंब’ ही वैश्विक संकल्पना ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केवळ देशातच नव्हे, तर सातासमुद्रापार जाऊन रुजवली आणि त्यातून स्वदेशाचा वटवृक्ष निर्माण केला. आणि त्याच वेळी अनितामार्इंनी आपले पती ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब, चिरंजीव उमेशदादा, सचिनदादा, राहुलदादा, कन्या प्रीतीताई, सुना, जावई, नातवंडे अशा या धर्माधिकारी कुटुंबाच्या प्रभावी कुटुंब समन्वयक म्हणून बजावलेली भूमिका अनन्यसाधारण आणि तितकीच महत्त्वाची होती.
पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा विचार महिलांमध्ये रुजवण्यात यश
अनितामार्इंची बालपणीची वृक्षमैत्री त्यांनी आयुष्यभर जोपासली. नवनवीन झाडे लावणे, त्यांना पोटच्या बाळाप्रमाणे सांभाळून मोठे करणे अशा प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी लाखो भगिनींच्या मनात पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा विचार पक्का रुजवला. याची प्रचिती डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून होणाऱ्या वृक्ष लागवड आणि संवर्धन मोहिमेतून सर्वत्र येते आहे. आरोग्य शिबिरे व स्वच्छता मोहिमा यामध्ये देखील त्यांना मोठी रुची होती. कार्यक्रमात त्या प्रत्यक्ष सहभागी होऊन सर्वांनाच आगळा उत्साह देत असत.
जयंत धुळप