Join us  

न दिसणाऱ्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू; पाच विभागीय सायबर पोलीस ठाण्यांचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 6:50 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : कोरोनाप्रमाणे गुन्हेगारी हाही एक प्रकारचा व्हायरस असून त्याला धडा शिकवणारी लस मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांच्या रूपाने उपलब्ध आहे, याचा अभिमान आहे

मुंबई : सायबर क्राईम डाेळ्यांना दिसत नाही. अशा या न दिसणाऱ्या शत्रूसंगे आपले युद्ध आता अधिक सक्षमतेने सुरू झाले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रजासत्ताकदिनी ५ विभागीय सायबर पोलीस ठाण्यांच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. त्यासाठी सायबर पोलीस ठाणे नक्कीच उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी दक्षिण विभागाच्या सायबर पोलीस ठाण्याचे प्रत्यक्षात, तर पूर्व, पश्चिम, उत्तर दक्षिण आणि मध्य विभाग सायबर पोलीस ठाण्याचे तसेच ९४ पोलीस ठाण्यातील स्वागत कक्षाचे ऑनलाइन उद्घाटन केले. कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील सहभागी झाले होते. तर मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, उपगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह पोलीस दलातील अनेक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कोरोनाप्रमाणे गुन्हेगारी हाही एक प्रकारचा व्हायरस असून त्याला धडा शिकवणारी लस मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांच्या रूपाने उपलब्ध आहे, याचा अभिमान आहे. सायबर सेलसोबतची मूळ पोलीस ठाण्याची इमारत १०३ वर्षांची असली तरी मजबूत आहे. तिच्यात आधुनिकतेकडे पाऊल टाकणारे सायबर पोलीस ठाणे सुरू केल्याने आधुनिकता आणि परंपरेचा मिलाप झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

९०० कोटींचा सायबर गुन्हेगारी सुरक्षा प्रकल्प लवकरच सुरूसायबर गुन्हे राेखण्यासाठीचा ९०० कोटींचा सायबर गुन्हेगारी सुरक्षा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले. अँटी नार्कोटिक सेल सक्षम करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तर, गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलीस ठाण्याची भूमिका महत्त्वाची आहे. स्वागत कक्षाच्या माध्यमातून माया, आपलेपणाची ऊब जाणवेल, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

टॅग्स :उद्धव ठाकरेसायबर क्राइम