Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमूलचा गुजरातमध्ये दुधाला २९, तर महाराष्ट्रात २३ रुपये दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 08:16 IST

कर्नाटकात बारमाही ३० रुपये; प्रगत महाराष्ट्रात दहा दिवसाला बदलतो दर

अरुण बारसकर

सोलापूर : गुजरातमध्ये गायीच्या दुधाला २९  रुपये दर देणारा अमूल दूध संघ महाराष्ट्रातील दूध २३ रुपयाने खरेदी करीत आहे. शेजारच्या कर्नाटकात बाराही महिने ३० रुपये दर हमखास मिळतो. मात्र, महाराष्ट्रात दहा दिवसाला दर बदलतो. महाराष्ट्रातील दूध व्यवसाय खासगी मालकांच्या हाती गेला असून, तेच दर ठरवत असल्याचे चित्र आहे. 

गुजरातमध्ये आन्ंदचे अमूल दूध प्रचलित आहे. गुजरातमध्ये खरेदी होणाऱ्या गायीच्या दुधाला सध्या प्रति लिटरला २९ रुपये २९ पैसे व त्यापेक्षा अधिक दर दिला जातो. तर म्हशीच्या दुधाला ४२ रुपये २७ पैसे व त्यापेक्षा अधिक दर दिला जातो. गुजरातमधील दूध मुंबई व परिसरातील शहरात पिशवीबंद विक्री केले जाते. याशिवाय उपपदार्थही विक्री होतात. हीच अमूल डेअरी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून दूध संकलन करते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र २३ रुपये दर देत आहे.

कर्नाटक फेडरेशनच्या नंदिनी डेअरीकडून प्रति लिटरला २५ रुपये व राज्य शासनाकडून प्रोत्साहन म्हणून पाच रुपये, असे शेतकऱ्यांच्या खात्यावर ३० रुपये जमा होतात.  त्यामुळे कर्नाटकाचे दूधसंकलन प्रति दिन ९० लाखांवर पोहोचले आहे. सहकार रुजलेल्या महाराष्ट्रात मात्र शेतकऱ्यांना  प्रति लिटरला १८ ते २५ रुपये इतका दर काही महिने सोडले तर मिळतो. याचे कारण संपूर्ण दूध व्यवसाय खासगी मालकांच्या हाती गेला आहे. महाराष्ट्रातील खासगी संघाचा दर २१ रुपये लिटर इतका झाला आहे. गुजरात व कर्नाटकातील शेतकऱ्यांना ३० रुपये  मिळत आहेत. केवळ खासगी दूध संघामुळे सहकारी दूध संघ मोठ्या आर्थिक अडचणीत आले आहेत. पुणे जिल्ह्यातून सहकारी व खासगी दूध संघांचे प्रतिदिन १९ लाख लिटर दूध संकलन होते. सोलापूर व इतर जिल्ह्यातील दररोज ५३ लाख लिटर दूध खासगी संघ संकलन करतात. मात्र पुण्याच्या दप्तरी ७२ लाख लिटरची नोंद होते.

अमूल डेअरी गाईच्या दुधाला गुजरातमध्ये २९ रुपये दर देते व महाराष्ट्रात २३ रुपये दर देत आहे. हे मागील आठवड्यात दुग्धविकास मंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेवेळी निदर्शनास आणले. मंत्र्यांनी यावर नोट तयार करुन एक भूमिका घेऊ, असे सांगितले आहे.     - रणजित देशमुख,     चेअरमन, महानंद, मुंबई

टॅग्स :मुंबईगुजरातदूध