Join us  

अमोल कोल्हेंनी घोषणा केलीच, केंद्रीय पर्यटनमंत्र्यांनी दिलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 8:48 AM

खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या मागणीला यश आले असून

मुंबई -  राज्यात अखेर शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाविकास आघाडीचं सरकार आलं. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं यश मिळालं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मेहनत फळाला आली. तर, या निवडणूक प्रचारात खारीचा वाटा उचलणाऱ्या डॉ. अमोल कोल्हेंच्याही कष्टाचं चीझ झालं. त्यानंतर, संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही कोल्हेंनी भेटीगाठीचा दौरा सुरुच ठेवला. काही दिवसांपूर्वी 18 तारखेला मी मोठी घोषणा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानुसार, अमोल कोल्हेंनी घोषणा केली आहे.

खासदारडॉ अमोल कोल्हे यांच्या मागणीला यश आले असून किल्ले शिवनेरीवर शिवसृष्टी व रोपवे, वढू तुळापूर येथे ऐतिहासिक वारसास्थळ शंभुसृष्टी निर्मिती करण्याच्या मागणीला केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. खासदारडॉ अमोल कोल्हे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसृष्टीची निर्मती सह रोप-वे निर्मिती करण्यात यावी, तसेच वढू तुळापूर या ठिकाणी शंभूसृष्टी उभारण्यात यावी अशी आग्रही मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नांना पर्यटन व सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी लेखी पत्राद्वारे लवकरच या निर्मितीसाठी केंद्रीय समितीमार्फत सर्व्हे केला जाईल, पॉलिसीनुसार त्यांनतर पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल, असे अमोल कोल्हेंनी सांगितले.

लोकसभा प्रचारामध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी भक्ती-शक्ती कॅरिडॉर अंतर्गत किल्ले शिवनेरीवरती शिवसृष्टीची निर्मिती तसेच शौर्यपीठ वढू तुळपुर येथे शंभुसृष्टी निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. याच आश्वासनाची मागणी 10 डिसेंबरच्या संसदीय भाषणात कोल्हेंनी शून्यप्रहारामध्ये केली होती. त्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आणि तमाम शिवभक्तांचे शक्तीतीर्थ असणाऱ्या किल्ले शिवनेरी येथे आबालवृद्धांना दर्शन घेता यावे यासाठी रोपवे आणि पायथ्याशी शिवप्रभूंचा पराक्रम आणि महाराष्ट्राची लोकसंस्कृती याचे दर्शन  घडवणारी "शिवसृष्टी"साठी लवकरच मार्ग निघेल, असे कोल्हेंनी सांगितले.

दरम्यान, वढू तुळापूर या ठिकाणी "शंभूसृष्टी"हे स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा ऐतिहासिक वरसास्थळ व शौर्यपीठ म्हणून शंभूराजे प्रेमींना, जाज्वल्य इतिहास अनुभावात येईल. भक्ती-शक्ती कॅरिडोअर निर्मितीमुळे शिरुर लोकसभा मतदारसंघात हजारो रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील व पर्यटनवृद्धी होण्यास निश्चितच फायदा होईल, असेही कोल्हेंनी सांगितले. दरम्यान, 18 डिसेंबर रोजी आपण मोठी घोषणा Big Announcement करणार असल्याचं अमोल कोल्हेंनी म्हटलं होत. त्यावेळी, अनेकांनी ही शिवनेरी किल्ल्यासंदर्भात घोषणा होईल, असा अंदाज लावला होता. तर, बैलगाडा शर्यतीचा मुद्दा निकाली निघाला असेल, असेही काहींना वाटत होते. तसेच, अनेकांनी 18 डिसेंबरची उत्कंठा अशा कमेंट त्यांच्या फेसबुक पोस्टवर केल्या होत्या. आता, कोल्हेंनी शिवसृष्टीचा संदर्भ देत आपली घोषणा केली आहे.  

टॅग्स :डॉ अमोल कोल्हेछत्रपती शिवाजी महाराजखासदारपर्यटन