Join us  

Amit deshmukh : सकारात्मक विचार करावा, पंकजा मुंडेंची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 10:10 PM

Amit deshmukh : राज्यातील वैद्यकीय शाखेच्या परीक्षा १९ एप्रिल ते ३० जून दरम्यान होत आहेत. दरम्यान, राज्यातील सुमारे ४५० विद्यार्थी आणि तेवढ्याच पालकांना कोरोनाची लागण झाली आहे.

ठळक मुद्देराज्यभरातील जवळपास 50 हजार विद्यार्थी वैद्यकीय शाखेची ही परीक्षा देणार आहेत. ही संख्या लक्षात घेता सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबई - राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत जास्तच भर पडत चालली आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय शाखेची परीक्षा तोंडावर आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या प्रस्तावित परीक्षा पुढे ढकलणं अपरिहार्य आहे, असे मत माजी मंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी व्यक्त केलंय. तसेच, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे परीक्षांसदर्भात मागणीही केली आहे. 

राज्यातील वैद्यकीय शाखेच्या परीक्षा १९ एप्रिल ते ३० जून दरम्यान होत आहेत. दरम्यान, राज्यातील सुमारे ४५० विद्यार्थी आणि तेवढ्याच पालकांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासाची साधनेही सध्या उपलब्ध नाहीत, अशी परस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंन ट्विट केलं आहे. राज्यात कोविड 19 च्या दुसरी लाटेने पहिल्या लाटेपेक्षा भयानक रुप धारण केले असल्यामुळे आधुनिक वैद्यकशास्त्राच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या प्रस्तावित परीक्षा पुढे ढकलणं अपरिहार्य आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मी मागणी करते, असे पंकजा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. 

राज्यभरातील जवळपास 50 हजार विद्यार्थी वैद्यकीय शाखेची ही परीक्षा देणार आहेत. ही संख्या लक्षात घेता सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. राज्यातील काही विद्यार्थ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे पत्राद्वारे याबाबत विनंती केली होती. 

सुप्रिया सुळेंनीही केली मागणी

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून या परिक्षेबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे. देशमुख यांनीही लागलीच सुळे यांची या मागणीची दखल घेतली असून याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे कळवले आहे.  

टॅग्स :पंकजा मुंडेकोरोना वायरस बातम्यावैद्यकीयपरीक्षाअमित देशमुख