दोन महिन्यांपासून रुग्णवाहिका बंद
By Admin | Updated: February 23, 2015 22:16 IST2015-02-23T22:16:12+5:302015-02-23T22:16:12+5:30
कर्जत तालुक्यातील सर्वाधिक रुग्ण प्राथमिक उपचार घेण्यासाठी नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून येथील रुग्णवाहिका बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

दोन महिन्यांपासून रुग्णवाहिका बंद
नेरळ : कर्जत तालुक्यातील सर्वाधिक रुग्ण प्राथमिक उपचार घेण्यासाठी नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून येथील रुग्णवाहिका बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.
विशेषत : ग्रामीण भागातून प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला रु ग्णांचे हाल होत आहेत. रायगड जिल्हा परिषदेने तत्काळ नवीन रु ग्णवाहिका नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राला देऊन रुग्णांची गैरसोय टाळावी, अशी मागणी माणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच कल्पना पारधी, नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच राजश्री कोकाटे यांनी केली आहे.
रेल्वे आणि एसटी स्थानकाला लागून असलेल्या नेरळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक सुविधांचा अभाव जाणवतो. स्टेशनजवळ असूनही जिल्हा परिषद कर्मचारी नेरळमध्ये बदली घेवून येण्यास पसंती देतात.कारण या ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग आणि प्रसूतीसाठी कायम वर्दळ असते. परंतु आता या ठिकाणी रुग्णांची सोय होण्याऐवजी गैरसोय अधिक होताना दिसते.
ग्रामीण भागातील महिलांकडून प्रसूतीसाठी याच रुग्णालयाला पसंती दर्शवण्यात येते. मात्र तेथील सरकारी रुग्णवाहिका ही कायम नादुरुस्त असल्याने त्याचा फटका रुग्णांना बसतो. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना नेहमी खाजगी गाडी करून किंवा कडाव, कळंब आणि कर्जत येथून रुग्णवाहिका मागवावी लागते. मात्र त्याचे काहीही सोयरसुतक नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.स्मिता भांबेरे यांना नाही.
प्रसूती झालेली महिला रु ग्ण तीन दिवसानंतर घरी जात असतांना तिला सुखरूप घरी पोहचिवण्याची जबाबदारी वैद्यकीय अधिकाऱ्यांची असते. नादुरुस्त रुग्णवाहिकेमुळे रुग्णांची हेळसांड होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी नवीन रुग्णवाहिकेबाबत सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन दिले आहे.