मुंबईची तहान भागवण्यासाठी महत्वाकांक्षी योजना !

By Admin | Updated: May 12, 2014 01:50 IST2014-05-11T19:02:45+5:302014-05-12T01:50:51+5:30

मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक ठिकाणी आजही पाण्याची कमतरता भासत असून ती भरून काढण्यासह मुंबई शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी राष्ट्रीय जल विकास संस्थेने एका महत्वाकांक्षी योजना मांडली आहे.

Ambitious plan to thwart Mumbai thirst! | मुंबईची तहान भागवण्यासाठी महत्वाकांक्षी योजना !

मुंबईची तहान भागवण्यासाठी महत्वाकांक्षी योजना !

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक ठिकाणी आजही पाण्याची कमतरता भासत असून, ती भरून काढण्यासह मुंबई शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा; यासाठी राष्ट्रीय जल विकास संस्थेने एका महत्वाकांक्षी योजनेचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डिपीआर) तयार केला आहे. या अहवालानुसार, मुंबई शहराला वर्षाला ५७.९ कोटी घन मीटर पाण्याचा पुरवठा होणार असल्याने मुंबईकरांची तहान भागणार आहे.
राष्ट्रीय जल विकास संस्थेच्या महत्वाकांक्षी योजनेनुसार, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला वर्षाला ५७.९ कोटी घन मीटर पाण्याचा पुरवठा होईल. या प्रकल्पातंर्गतच गुजरातमधील दमणगंगा नदी आणि महाराष्ट्रातील पिंजाळ नदी; या दोन्ही नद्यांना जोडण्याचा प्रस्ताव आहे. दमणगंगेचे अतिरिक्त पाणी तीन बांध आणि दोन जलबोगद्यांनी पिंजाळसाठी हस्तांतरित केले जाणार आहे. त्यानंतर कुठे या पाण्याचा मुंबईतील घराघरांना पुरवठा केला जाणार आहे.
राष्ट्रीय जल विकास संस्थेचे संचालक एस. मसुद हुसैन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, हा प्रकल्प मुंबई शहरासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण या माध्यमातून शहरातील नागरिकांच्या पाण्याच्या गरजा पुर्ण केल्या जाणार आहेत. मुंबई महापालिकेच्या अंदाजानुसार, २०४१ सालापर्यंत मुंबईकरांची पाण्याची मागणी ६ हजार ६८० दशलक्ष लिटर प्रतिदिन एवढी असणार आहे. शिवाय पाण्याची मागणी आणि पुरवठा यातील अंतर मोठे असणार आहे.
दमणगंगा-पिंजाळ या जोडप्रकल्पातून १ हजार ६०० दशलक्ष लिटर प्रतिदिन इतक्या पाण्याचा पुरवठा करण्याचे उद्दीष्ट आहे. याव्यतिरिक्त अतिरिक्त पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून ८६५ दशलक्ष लिटर प्रतिदिन एवढे पाणी पिंजाळ धरणातून मिळविण्यासाठीचा प्रस्ताव आहे.
दरम्यान, २०१२ साली मुंबई शहराला ४ हजार ५२९ दशलक्ष लिटर प्रतिदिन एवढया पाणीपुरवठयाची आवश्यकता होती. प्रत्यक्षात मात्र ३ हजार ६७५ दशलक्ष लिटर प्रतिदिन एवढयाच पाण्याचा पुरवठा केला जात होता. म्हणजेच ८५४ दशलक्ष लिटर प्रतिदिन पाण्याची आणखी गरज आहे. या प्रकल्पाद्वारे ती भरून काढली जाईल, असा दावा संस्थेने केला आहे. शिवाय महत्वाकांक्षी योजनेचा विस्तृत प्रकल्प अहवाल ३१ मार्चपर्यंत कार्यान्वित होईल, असेही हुसैन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
...................

Web Title: Ambitious plan to thwart Mumbai thirst!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.