अंबरनाथ : चार जागांवरुन आघाडीचे घोडे अडले
By Admin | Updated: March 30, 2015 00:09 IST2015-03-30T00:09:07+5:302015-03-30T00:09:07+5:30
अंबरनाथ नगरपरिषदेत शिवसेना आणि भाजपा हे स्वतंत्र निवडणूक लढविणार हे निश्चित झाले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस,राष्ट्रवादी आणि रिपाइंंच्या आघाडीचा

अंबरनाथ : चार जागांवरुन आघाडीचे घोडे अडले
पंकज पाटील, अंबरनाथ
अंबरनाथ नगरपरिषदेत शिवसेना आणि भाजपा हे स्वतंत्र निवडणूक लढविणार हे निश्चित झाले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस,राष्ट्रवादी आणि रिपाइंंच्या आघाडीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. रिपाइंच्या चार जागांवर काँग्रेसने आपले उमेदवार देण्याची तयारी सुरु केल्याने आघाडीचे घोडे अडले आहे.
५७ जागांसाठी २२ एप्रिल रोजी निवडणुका घेण्यात येणार आहेत. ३१ मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने आघाडीचा निर्णय हा रविवारपर्यंत होणे अपेक्षित आहे. आघाडीच्या चर्चेला योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने अद्याप निर्णय झालेला नाही. काँग्रेसने केवळ राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याची तयारी ठेवली आहे. तर राष्ट्रवादी ही रिपाइं (सेक्युलर) सोबत आघाडी करण्यास इच्छुक आहेत. काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या रिपाइंच्या तीन नगरसेवकांनी नगराध्यक्ष निवडणुकीत बंडखोरी केल्याने रिपाइंला बाजूला ठेऊन आघाडी करण्याची तयारी काँग्रेसने ठेवली आहे. तर रिपाईला मानणारा गट मोठा असल्याने रिपाइंला सोबत घेऊन जाण्यास राष्ट्रवादी प्रयत्नशिल आहे. त्यातही तिन्ही पक्षांची आघाडी व्हावी यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले, सुभाष पिसाळ, माजी खासदार आनंद परांजपे तर काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री आणि निवडणूक निरिक्षक रवी पाटील व रिपाइंतर्फे शाम गायकवाड आणि कबिर गायकवाड हे आता शेवटची बैठक घेऊन निर्णय काढण्याचा प्रयत्न या पक्षांचा आहे.
काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याची इच्छा प्रदेश कार्यालयाकडे कळवली आहे. मात्र अपेक्षित जागा सोडण्यास रिपाइं तयार असल्यास आघाडीचीही तयारी ठेवली आहे.