अमरमहाल ते परळ जलबोगदा; एका महिन्यात ५२६ मीटर खोदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 01:59 PM2022-01-14T13:59:56+5:302022-01-14T14:00:22+5:30

भूमिगत जलबोगदा खणन कामात महापालिकेचे विक्रमी कामगिरी

Amarmahal to Paral reservoir; Digged 526 meters in one month tunnel | अमरमहाल ते परळ जलबोगदा; एका महिन्यात ५२६ मीटर खोदला

अमरमहाल ते परळ जलबोगदा; एका महिन्यात ५२६ मीटर खोदला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - कोस्टल रोडसाठी बोगदा खणन काम विक्रमी वेळेत पूर्ण केल्यनानंतर महापालिकेने आता भूमिगत जलबोगदा खणण्यात नवीन उच्चांक नोंदवला आहे. एका महिन्यात ५२६ मीटर खणन तर एकाच दिवसात ४० मीटरपेक्षा अधिक खणन करण्याची कामगिरी एकाच आठवड्यात दोनवेळा पूर्ण करीत पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने आपले कौशल्य दाखविले आहे. या दोन्ही बोगद्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर शंभर किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या  पाणीपुरवठ्यासाठी भूमिगत बोगदे असणारे मुंबई हे जगातले दुसरे शहर ठरणार आहे. 

पूर्व उपनगरामध्ये पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी दोन भूमिगत जलबोगदे बांधण्यात येत आहेत. अमरमहाल ते परळ हा सुमारे ९.६८ किलोमीटर लांबीचा भूमिगत जलबोगदा सायन, माटुंगा, परळ, भायखळा, कुर्ला विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा सुधारण्यास मदत करणार आहे. तर अमरमहाल ते ट्रॉम्बे उच्च पातळी जलाशयापर्यंत जाणारा दुसरा बोगदा हा सुमारे ५.५२ किलोमीटर लांबीचा आहे. त्याद्वारे चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, शिवाजी नगर विभागातील पाणीपुरवठा सुधारण्यास मदत होणार आहे. 

अशी आहे विक्रमी कामगिरी... 

अमरमहाल ते परळ या पहिल्या भूमिगत बोगद्याच्या कामामध्ये डिसेंबर २०२१ या एकाच महिन्यात तब्बल ५२६ मीटर खणन पूर्ण करण्यात आले आहे. बोगद्याच्या कामाला सुरुवात केल्यानंतर ८५ दिवसांच्या कालावधीत सुमारे एक किलोमीटरचे खणन पूर्ण करण्याची कामगिरी साध्य झाली आहे. तर अमरमहाल ते ट्रॉम्बे या दुसऱ्या बोगद्याच्या खणन कामामध्ये एकाच दिवशी ४०.३ मीटर खणन करण्याची कामगिरी एकाच आठवड्यात दोनवेळा करण्यात आली आहे. या दुसऱ्या बोगद्याचे एकूण २.७५ किलोमीटरचे म्हणजेच ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. या भूमिगत जलबोगद्यांसाठी ‘टेराटेक’ कंपनीचे बोगदा खणन संयंत्र कार्यान्वित आहे. 

अमरमहाल ते ट्रॉम्बे या भूमिगत जलबोगदा प्रकल्पअंतर्गत बोगदा खणन संयंत्र (टीबीएम) च्या सहाय्याने खणन कामाची सुरुवात ६ मार्च २०२१ रोजी करण्यात आली. हे दोन्ही भूमिगत जलबोगदे ठरलेल्या मुदतीत म्हणजे अनुक्रमे २०२६ आणि २०२४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. तर चेंबूर ते वडाळा या अंतराचा अंशतः बोगदा २०२५ मध्ये सुरु होऊ शकेल.

हे दोन्ही बोगदे जमिनीखाली सुमारे १०० ते ११० मीटर खोलीवर बांधण्यात येत आहेत. त्यांचा व्यास ३.२ मीटर इतका आहे. या बोगद्यांमधून येणाऱ्या भूमिगत जलवाहिन्या या मुख्य जलवाहिनी आणि सेवा जलाशय यांना जोडल्या जाणार आहेत. पूर्व द्रुतगती मार्गावर स्थित दोन मुख्य जलवाहिन्यांमधून येणारे पाणी या बोगद्यांद्वारे पुढे जाणार आहे.

भूमिगत जलबोगद्यांचे जगातील दुसरे शहर....

या दोन्ही बोगद्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर, १०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचे भूमिगत पाणीपुरवठा बोगदे असणारे मुंबई हे जगातले दुसरे शहर ठरणार आहे. सध्या फक्त न्यूयॉर्क शहरातच १०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचे भूमिगत जलबोगदे आहेत.

Web Title: Amarmahal to Paral reservoir; Digged 526 meters in one month tunnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.