पर्यायी मार्ग बंद... मग वाहतूककोंडी सुटणार कशी?

By Admin | Updated: February 3, 2015 01:50 IST2015-02-03T01:50:19+5:302015-02-03T01:50:19+5:30

दक्षिण मुंबईतील मोहम्मद अली रोडवरील वाहतूककोंडी लशात घेऊन शासनाने पर्यायी मार्ग म्हणून जे. जे. उड्डाणपुलाची उभारणी केली खरी.

Alternate route closed ... How to drive traffic? | पर्यायी मार्ग बंद... मग वाहतूककोंडी सुटणार कशी?

पर्यायी मार्ग बंद... मग वाहतूककोंडी सुटणार कशी?

‘लोकमत’ची विशेष पाहणी : गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूककोंडीचा मूळ प्रश्न जैसे थे
चेतन ननावरे - मुंबई
दक्षिण मुंबईतील मोहम्मद अली रोडवरील वाहतूककोंडी लशात घेऊन शासनाने पर्यायी मार्ग म्हणून जे. जे. उड्डाणपुलाची उभारणी केली खरी. मात्र दुचाकीस्वारांच्या वाढत्या अपघातांच्या कारणास्तव २०१० साली शासनाने दुचाकीस्वारांना उड्डाणपुलावर बंदी घातली. मात्र गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या लक्षात घेता येथील वाहतूककोंडीचा मूळ प्रश्न जैसे थे असल्याचे लक्षात येते. हा प्रश्न आणखी भयंकर होत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या विशेष पाहणीत निदर्शनास आले.
मध्य मुंबईसह उपनगरांतून दुचाकीवर येणाऱ्या प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरात आहे. अशा परिस्थितीत वाहतूककोंडीमुळे त्रासलेला दुचाकीस्वार जे.जे. उड्डाणपुलावरून जाण्याचा प्रयत्न करतो. उड्डाणपुलाचा वापर केल्यास वारंवार ब्रेक दाबणे, हॉर्न वाजवणे, स्पीड ब्रेकर किंवा लोकांचा अडसर, सिग्नल अशा गोष्टीचा अडसर प्रवासादरम्यान आला नाही. सरासरी ताशी ४० ते ५० कि.मी. वेगाने बाइक चालवल्यानंतरही ३ मिनिटांत सीएसटीला पोहोचता आले. याउलट उड्डाणपुलाखालून बाइकने प्रवास करताना त्रासदायक अनुभव आला.

वेळ : दु. १ वा. / ग्रँट मेडिकल कॉलेज : दु.१ वाजता जे.जे. उड्डाणपुलाची सुरुवात होते, तेथून ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी प्रवासाला सुरुवात केली. जे.जे. उड्डाणपुलाशेजारून जातानाच वाहतूककोंडीला सुरुवात झाली. एकीकडे उड्डाणपुलावर जाणारी लेन मोकळी दिसत असताना उड्डाणपुलाशेजारून जाणाऱ्या मार्गावरील कोंडी ग्रँट मेडिकल कॉलेजच्या सिग्नलपर्यंत आली होती.

हा त्रास कशासाठी? : जे.जे. उड्डाणपुलाखालून जाताना हातगाडी, सायकलवर आणि डोक्यावर किरकोळ साहित्याने भरलेल्या पाट्या वाहून नेणाऱ्या हमालांमधून वाट काढताना दुचाकीस्वारांचा घाम निघतो. या सर्व आव्हानांना आणि वाहतूूककोंडीला तोंड देत दुचाकीस्वारांना प्रवास करावा लागत आहे. शिवाय त्यासाठी सुमारे २० ते २५ मिनिटे खर्ची घालावी लागतात. म्हणूनच अनेक दुचाकीस्वार हा किचकट आणि तापदायक मार्ग सोडून बेकायदेशीर मार्ग अवलंबणे पसंत करतात. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत सीएसटीकडे जाताना व सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत सीएसटीकडून येताना हेच चित्र असते.

वेळ : १:०२:२७ / डॉ. अल्लमा मोहम्मद इक्बाल चौक
उड्डाणपुलाशेजारून पहिल्याच सिग्नलपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे २ मिनिटांचा कालावधी खर्ची घालावा लागला. या सिग्नलला डावे वळण घेतले असता सॅण्डहर्स्ट रोड थानकाकडेही जाता येते.
वेळ : १:०४:४४ / सकलैनी मशीद पीस लेन
आणखी सव्वा मिनिटाचा प्रवास केल्यानंतर सकलैनी मशीद पीस लेनचा सिग्नल येतो. दोन चौकांमध्ये असलेल्या या सिग्नलकडे सर्वच वाहने साफ दुर्लक्ष करून जातात. त्यामुळे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या मशिदीपर्यंत पोहोचणेही रहिवाशांना जिकिरीचे झाले आहे.
वेळ : १:०७:०९ / स्वातंत्र्यसैनिक मौलाना मोहम्मद अली जौहर चौक
या चौकातून डावे वळण घेतले असता डोंगरी, तर उजवे वळण घेता नळ बाजार येतो. गोलदेऊळ व कटलरी मार्केटही याच ठिकाणी आहेत. त्यामुळे हातगाडीचालकामुळे कोंडीत भर पडते.
वेळ : १:०९:२४ / पायधुनी जंक्शन : पायधुनी मार्केटसह झवेरी बाजार आणि मुंबादेवीकडे जाण्यास हा सोपा मार्ग आहे. मात्र काटरस्ता असलेल्याने नेहमीच वाहतूककोंडी असते.
वेळ : १:११:५४ / मिनार मशीद
मुस्लीम धर्मीयांचे प्रार्थनास्थळ असलेल्या मिनार मशीदसमोर नेहमीच वर्दळ असते. मिठाई आणि खाद्यपदार्थांची नामवंत दुकाने या परिसरात आहेत. खवय्ये या ठिकाणी फिरकत असतात.
वेळ : १:१३:५९ / हुजूर अश्रफुल उलामा चौक
या ठिकाणी अनेक कॉर्पोरेट कार्यालये आहेत. शिवाय युसूफ मेहेरअली मार्गाची वाहतूक याच ठिकाणी मोहम्मद अली रोडला जोडली जाते.
वेळ : १:१५:५८ / जंजीकर स्ट्रीट
मुस्लीम धर्मीयांचे प्रार्थनास्थळ जामा मशीद आणि फटाक्यांच्या होलसेल विक्रीची दुकाने या चौकात आहेत. त्यामुळे या ठिकाणी सर्रासपणे डबल पार्किंग होते. परिणामी वाहतूककोंडी वाढते.
वेळ : १:१७:१९ / चायना वर्ल्ड बाजार
या चौकातून डावीकडे वळण घेतल्यास कर्नाक बंदर ब्रिजकडे जाता येते. तर उजवीकडून मंगलदास मार्केटची वाहतूक सुरू असते. परिणामी या ठिकाणी वाहतुकीचा अधिक ताण असतो.
वेळ : १:१९:३९ / एमआरए पोलीस ठाणे
जे.जे. उड्डाणपूल येथे संपतो. मध्यंतरी येणाऱ्या मनीष मार्केटसमोर नेहमीच कोंडी असते.

Web Title: Alternate route closed ... How to drive traffic?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.