Join us

कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी क्लीन-अप मार्शलाही टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 19:07 IST

clean-up marshal : विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना २०० रुपये दंड

मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जे मास्क  लावणार नाहीत; अशांवर मुंबई महापालिकेने वेगाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईसाठी क्लीन-अप मार्शलची मदत घेतली जात असून, याबाबत झालेल्या करारानुसार दंडाद्वारे प्राप्त झालेल्या रक्कमेतील ५० टक्के रक्कम पालिकेला क्लीन-अप मार्शलची नेमणूक करणा-या संस्थांना द्यावी लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबई महापालिकेने संस्थांच्या माध्यमातून एका प्रभागात ९० असे २४ प्रभागात क्लीन-अप मार्शल नेमले असून, मार्शलला टार्गेट देण्यात आले आहे.

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर अत्यावश्यक आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर आर्थिक दंडाची कारवाई केल्यानंतर सोबत त्यांना एक मास्क विनामूल्य देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. विना मास्क आढळलेल्या ४ लाख ८५ हजार ७३७ नागरिकांवर कारवाई करून महापालिकेने आतापर्यंत सुमारे १० कोटी ७ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. कोरोना रोखण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे नागरिकांनी मास्क वापरणे आवश्यक आणि जरुरीचे आहे. यासाठी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विना मास्क घराबाहेर  फिरणाऱ्या नागरिकांना २०० रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले होते. प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयात यासाठी  पथके तयार आहेत. पथकात पर्यवेक्षक, कनिष्ठ अवेक्षक, मुकादम, उपद्रव शोधक याच बरोबर विभागात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे. क्लीन-अप मार्शल ही नियुक्त करण्यात आले आहेत. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईमुंबई महानगरपालिका