वस्तू वाटपाची ‘परीक्षा’
By Admin | Updated: December 2, 2014 00:56 IST2014-12-02T00:56:42+5:302014-12-02T00:56:42+5:30
विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी सुरू केलेल्या शालेय वस्तू वाटपाचे तीनतेरा वाजले आहेत़ यावर अनेक वेळा आरोप होऊनही चौकशीस मात्र प्रशासनाने तयारी दाखविली नव्हती़

वस्तू वाटपाची ‘परीक्षा’
मुंबई : विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी सुरू केलेल्या शालेय वस्तू वाटपाचे तीनतेरा वाजले आहेत़ यावर अनेक वेळा आरोप होऊनही चौकशीस मात्र प्रशासनाने तयारी दाखविली नव्हती़ अखेर या वर्षी पहिल्यांदाच वस्तू वाटपाचे आॅडिट केले जाणार आहे़ मात्र केवळ ५० शाळांचे आॅडिट करून १२०० शाळांमधील वितरण व्यवस्थेचा न्यायनिवाडा कसा होणार, असा सवाल केला जात आहे़
२००७ पासून पालिकेने विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तूंचे वाटप सुरू केले़ मात्र ही योजना सुरू झाल्याच्या पहिल्या वर्षापासूनच वस्तू वाटपाचा खेळखंडोबा झालेला आहे़ पावसाळ्यानंतर रेनकोट आणि परीक्षेनंतर पुस्तक हातात पडत असल्याने या वाटपाचे आॅडिट करण्याची मागणी अनेक वेळा पालकवर्ग व नगरसेवकांकडून करण्यात आली़ यास विद्यमान आयुक्त सीताराम कुंटे यांनीही अनुकूलता दर्शविल्यानंतर आॅडिटचा निर्णय झाला आहे़
त्यानुसार पालिकेने मागविलेल्या निविदेत दोन संस्थांनी आॅडिट करण्याची तयारी दाखविली़ यापैकी आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटची निवड करण्यात आली आहे़ पुढील दोन महिन्यांमध्ये या आॅडिटचा अहवाल संस्थेमार्फत अतिरिक्त आयुक्त विकास खारगे यांना सादर करण्यात येणार आहे़ त्यानुसार या योजनेचे भवितव्य ठरणार आहे़ मात्र ५० शाळांवरून १२०० शाळांचा हिशोब पालिका कसा लावणार, याबाबत साशंकताच व्यक्त होत आहे़ (प्रतिनिधी)