Join us  

'या' 12 जागांसाठी युतीची लढाई, पश्चिम महाराष्ट्रात भाजपा आग्रही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 9:47 AM

पश्चिम महाराष्ट्रातील माण, वाई, अक्कलकोट, पंढरपूर, फलटण, कागल या जागांसाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे.

युतीमध्ये लहान भावाची भूमिका स्वीकारत कमी जागांवर समाधान मानताना शिवसेना राज्य मंत्रिमंडळातील मंत्रिपदे वाढवून घेण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या शिवसेनेचे दहा मंत्री असून, किमान 13 ते 14 मंत्रिपदे आपल्या वाट्याला यावी, असा प्रस्ताव शिवसेनेकडून भाजपला देण्यात आल्याची माहिती आहे. सध्या युतीसाठी भाजपा आणि शिवसेनेकडून काही जागांसाठी वाद आहे. त्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रातील सहा, विदर्भातील तीन आणि तीन जागांचा समावेश असल्याची माहिती आहे. 

पश्चिम महाराष्ट्रातील माण, वाई, अक्कलकोट, पंढरपूर, फलटण, कागल या जागांसाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपाने राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आपल्याकडे घेतल्यामुळे तेथील जागांवर भाजपाकडून दावा करण्यात येत आहे. त्यात, साताऱ्यातील माण, फलटण, पंढरपूर, अक्कलकोट या जागांवर भाजप आपले उमेदवार करण्यास इच्छुक आहे. मात्र, शिवसेनाही येथील जागांवर आग्रही आहे. तसेच, मुंबईतील वडाळा, शिवाजीनगर आणि ठाण्यातील उल्हासनगर या तीन जागांचाही युतीच्या वादात समावेश आहे. तर, विदर्भातील देवळी, रिसोड, गोंदिया या जागांसाठीही भाजपा आणि शिवसेनेकडून लढाई सुरू आहे.

राज्यातील या 12 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी युतीत सध्या बारा वाजल्याचे दिसून येत आहे. मात्र, शिवसेनेला दोन-तीन मंत्रीपदे देऊन भाजपने शिवसेनेला 122 ते 123 जागा देण्याची तयारी दर्शवल्याचेही समजते. मात्र, 126 पर्यंत जागा व मंत्रिपदे वाढवून द्यावीत, यासाठी शिवसेना आग्रही आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांची जागावाटपाबाबत सोमवारीही चर्चा झाली. केंद्रातील वाटा वाढवून घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. मोदी मंत्रिमंडळात सध्या अरविंद सावंत हे शिवसेनेचे एकमेव कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांच्याकडे तुलनेने कमी महत्त्वाचे खाते आहे. शिवसेनेच्या या प्रस्तावाला भाजपने अद्याप होकार दिलेला नाही. 

टॅग्स :मुंबईशिवसेनाभाजपाविधानसभा निवडणूक 2019राजकारण