‘अलाईन्स एअर’च्या वैमानिकांचा जून महिन्याचा पगार रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:05 IST2021-07-20T04:05:59+5:302021-07-20T04:05:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या ‘अलाईन्स एअर’च्या वैमानिकांना जून महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाही. जुलै ...

‘अलाईन्स एअर’च्या वैमानिकांचा जून महिन्याचा पगार रखडला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या ‘अलाईन्स एअर’च्या वैमानिकांना जून महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाही. जुलै महिन्याची २० तारीख उजाडली तरी वेतन न मिळाल्याने हे कर्मचारी चिंतेत आहेत.
यासंदर्भात वैमानिकांनी नवनिर्वाचित हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जुलै महिन्याची २० तारीख उजाडली तरी आम्हाला जून महिन्याचा पगार मिळालेला नाही. कोरोनामुळे वेतनात ६० टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. ४० टक्के वेतनात घर कसे चालवायचे, हा प्रश्न आमच्यासमोर आहे. त्यात इतके दिवस पगार रखडल्याने खर्चाचा ताळमेळ जमवताना नाकीनऊ येत आहेत.
ग्राउंड स्टाफ, केबिन क्रू, कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे वेतन १० दिवसांपूर्वीच झाले; मात्र वैमानिकांच्या वेतनाबाबत दुजाभाव का, असा सवालही करण्यात आला आहे.