विवस्त्र करुन मारहाणीचा तरूणीचा आरोप
By Admin | Updated: December 22, 2014 22:21 IST2014-12-22T22:21:04+5:302014-12-22T22:21:04+5:30
परस्परविरोधी तक्रारीवरून दाखल झालेल्या गुन्ह्याच्या चौकशीदरम्यान विवस्त्र करून मारहाण केल्याचा आणि त्याची अश्लील व्हिडीओ

विवस्त्र करुन मारहाणीचा तरूणीचा आरोप
कल्याण : परस्परविरोधी तक्रारीवरून दाखल झालेल्या गुन्ह्याच्या चौकशीदरम्यान विवस्त्र करून मारहाण केल्याचा आणि त्याची अश्लील व्हिडीओ क्लिप काढून ती प्रदर्शित करण्याची धमकी दिल्याच्या एका तरूणीच्या आरोपाने कोळसेवाडी पोलीस वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पिडीत तरूणीच्या तक्रारीवरून पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी संबधितांच्या चौकशीचे आदेश सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत थोरात यांना दिले आहेत.
कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात राहणाऱ्या महिलेचा एका तरूणीबरोबर पैसे उसने घेतल्याच्या कारणावरून रविवारी वाद झाला. यावेळी या दोघांत मारहाणीचा प्रकारही घडला. हा वाद सुरू असताना तरूणीच्या दोन बहिणी तीच्या मदतीसाठी धावून आल्या. हे प्रकरण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आल्यावर पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल केले. दरम्यान पोलीस ठाण्यातच पुन्हा तक्रारदारांमध्ये वाद झाला. यात पुरूष पोलिसांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आणि अंगावरील कपडे फाडून त्याची व्हिडीओ क्लिप काढून ती प्रदर्शित करण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारदार पिडीत तरूणीने केला आहे. या तरूणीबरोबर आलेल्या दोघींनीही पोलिसांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पिडीत तरुणीने सोमवारी पोलिस उपायुक्त संजय जाधव यांची भेट घेतली. (प्रतिनिधी)