Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवाब मलिक यांच्यावरील आरोपांचा तपास झाला सुरू; समीर वानखेडे यांचा जबाब नोंदविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 06:38 IST

समीर वानखेडे यांचा जबाब नोंदविला; गोरेगाव पोलिसांत तक्रार

मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे केलेल्या तक्रारीप्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.  तक्रारदार समीर वानखेडे यांचा जबाब नोंदविण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे. 

मलिक यांनी वानखेडे यांच्यावर आरोप करताना वानखेडे कुटुंबीयांबद्दल ‘बोगस’ या शब्दाचा वापर केला होता.  वर्षभरात त्यांची नोकरी जाणार, त्यांना तुरुंगात टाकणार, अशी विधाने त्यांनी केली होती. वानखेडे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर येऊन आरोपांबाबत आपण तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले.  वानखेडे यांनी दिल्लीला जाऊन पहिल्या विवाहासंदर्भातील घटस्फोटाची कागदपत्रे व अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांच्याकडे सुपुर्द केले.

आयोगाने या प्रकरणी महाराष्ट्र सरकारला २९ ऑक्टोबरला नोटीस दिली आहे. याचा सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण गोरेगाव विभागाच्या हद्दीतील आहे. परंतु, गोरेगाव विभागाच्या कारभाराची अतिरिक्त जबाबदारी बोरीवली विभागाच्या साहाय्यक आयुक्तांकडे (एसीपी) असल्यामुळे,  बोरीवली विभागाच्या एसीपी रेखा भवरे यांच्यामार्फत ही चौकशी सुरू आहे.

मुंबईत सहा कोटींच्या ड्रग्जसहित नायजेरियन नागरिकाला अटक

अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कांदिवली युनिटने सहा कोटी रुपयाच्या ड्रग्जसह  नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे. इनुसा गॉडवीन ऊर्फ जॉन ऊर्फ इनुसा पीटर (३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. उपायुक्त दत्ता  नलावडे यांच्या नेतृत्त्वात ही कारवाई झाली. त्याला यापूर्वीही ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. जामिनावर बाहेर पडल्यानंतर तो पुन्हा ड्रग्ज तस्करीत सक्रिय झाला. 

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव येथील आरे रोड परिसरात काही जण ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. पथकाने सापळा रचून बुधवारी दुपारी इनुसा गॉडवीन याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सहा कोटी किमतीचे ड्रग्ज सापडले आहे. इनुसा हा नायजेरियन नागरिक आहे. साकिनाका मेट्रो स्टेशनजवळील पदपथावर राहतो. त्याने हे ड्रग्ज कुठून व कसे आणले? याबाबत अधिक तपास सुरू आहे. इनुसाला यापूर्वी घाटकोपर आणि आझाद मैदान युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकासह नागपूरच्या पोलिसांनी ड्रग्जच्या गुन्ह्यात अटक केली होती. 

टॅग्स :नवाब मलिकसमीर वानखेडे