लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : स्वतःला देवाचा अवतार सांगणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात ज्या व्यक्तीविरोधात पुरावा मिळेल त्या सर्वांची चौकशी केली जाईल. तसेच या प्रकरणात आरोपीला मदत करणाऱ्या आणि त्याच्याशी हितसंबंध असणाऱ्या व्यक्तींचीही चौकशी केली जाईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. या प्रकरणात पोलिसांवर दबाव आणणाऱ्या किंवा हस्तक्षेप करणाऱ्या कुणालाही पाठीशी घालणार नाही, असा इशाराही त्यांनी मंगळवारी विधानसभेत दिला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी भोंदूबाबा खरातविषयी विधानसभेत सविस्तर निवेदन केले. अनेक राजकारण्यांचे खरातसोबतचे फोटो सोशल मिडीयावर झळकले आहेत, त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, आपण राजकारणात आहोत, कोणाचा फोटो कोणासोबत आहे यावरून तो आरोपी होत नाही. भोंदूबाबा खरातच्या मोबाइलची फॉरेन्सिक तपासणी सुरू असून, डेटा रिट्रिव्ह करण्याचे काम सुरू आहे. मुंबईतील फॉरेन्सिक लॅबमध्ये त्याच्या मोबाइलमधील डिलिट केलेला डेटाही काढण्यात येणार आहे. यातून त्याला कुणी संपर्क केला आहे का? कुणी मॅसेज केला आहे का? याची माहिती समोर येईल.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी खरातविरोधात नोंद झालेल्या गंभीर गुन्ह्यांचा आणि त्याच्या नावावर असलेल्या मालमत्तांची यादी देखील वाचून दाखविली.
गुंगीचे पदार्थ देऊन महिलांवर बलात्कार
अशोक खरात याने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करत अनेक महिलांचा विश्वास संपादन केला. धार्मिक विधी, मंत्र-तंत्र आणि अंधश्रद्धेचा आधार घेत महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर बलात्कार, अश्लील कृत्य केल्याचे तपासातून उघड झाले आहे. काही प्रकरणांमध्ये महिलांना गुंगीचे पदार्थ देऊन बलात्कार केल्याचेही समोर आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या प्रकरणात आतापर्यंत एकूण आठ गुन्हे दाखल झाले असून, सहा पीडित महिलांच्या तक्रारींवरून कारवाई करण्यात आली आहे. एसआयटीमार्फत तपास सुरू आहे. तपासादरम्यान आणखी काही पीडित महिलांचा शोध घेतला जात असून, त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करून तक्रार दाखल करण्यास तयार केले जात असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास
तपासात आरोपीकडे नाशिक, अहमदनगर, शिर्डी, नवी मुंबई आदी ठिकाणी जमिनी, प्लॉट, कार्यालये तसेच कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे समोर आले असून, आयकर विभागाशी समन्वय साधण्यात येत आहे. यात शासकीय अधिकाऱ्यांनी संगनमत केले असेल तर त्यांच्याविरोधातही कारवाई केली जाईल.
सोशल मीडियावर व्हायरल झालेले पीडितांचे फोटो व व्हिडिओ हटवण्यासाठीही तत्काळ पावले उचलण्यात आली आहेत. संबंधित प्लॅटफॉर्मना सूचना देऊन अशा सामग्रीवर बंदी आणण्याची कारवाई सुरू आहे. पीडित महिलांचे समुपदेशन, संरक्षण आणि न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. उर्वरित संभाव्य पीडितांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
Web Summary : Maharashtra CM orders inquiry into all who helped fraudster Baba Kharat. Eight crimes registered; SIT investigates. Kharat exploited women, promising divine powers. Assets being probed; victims urged to report.
Web Summary : फर्जी बाबा खरात की मदद करने वालों की महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने जांच के आदेश दिए। आठ अपराध दर्ज; एसआईटी जांच कर रही है। खरात ने दैवीय शक्ति का वादा कर महिलाओं का शोषण किया। संपत्ति की जांच जारी; पीड़ितों से रिपोर्ट करने का आग्रह किया।