Join us  

Coronavirus: मुंबईतील लोकल सेवा ३१ मार्चपर्यंत बंद; रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 1:41 PM

Coronavirus: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वेनं मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय. ३१ मार्चपर्यंत लोकल सेवा रद्द करण्याचा निर्णय रेल्वेनं जाहीर केलाय. गेल्या काही दिवसांपासून वारंवार लोकल सेवा बंद करण्याचा विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला होता. अखेर आज रेल्वे प्रशासनानं लोकल सेवा बंद करण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन देशवासीयांना केलं होतं. त्यामुळे आज देशभरात शुकशुकाट पाहायला मिळतोय. लोकलची संख्यादेखील कमी असून त्यामधून केवळ अत्यावश्यक सेवेत असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जातोय. यानंतर आता रेल्वेनं लोकल सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत लोकल सेवा पूर्णपणे बंद असेल.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, रेल्वेनं प्रवास शक्यतो टाळा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं होतं. मुंबईकरांनी प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास आम्हाला नाईलाजास्तव लोकल सेवा बंद करावी लागेल, असंदेखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्यासोबत लोकल सेवा बंद करण्यासंदर्भात चर्चादेखील केली होती. केंद्रीय आरोग्य मंत्री याबद्दल सकारात्मक असल्याचं टोपेंनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. यानंतर आज लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस