Join us  

मुंबईतील निर्बंध शिथील, सर्व दुकानं दुपारी २ पर्यंत सुरू राहणार; सम-विषम फॉर्म्युल्याने वेळापत्रक जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 9:22 PM

मुंबईतील सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी पालिका प्रशासनाने दिली आहे.

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आला असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. ' ब्रेक दि चेन' या मोहिमेअंतर्गत मुंबईतील सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी पालिका प्रशासनाने दिली आहे. त्यानुसार रस्त्याच्या डाव्या व उजव्या बाजूची दुकानं सुरू ठेवण्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. तर शनिवार, रविवार हे दोन दिवस सर्व दुकानं बंद राहणार आहेत. 

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने मुंबईत बाधित रुग्णांची संख्या दररोज नऊ ते दहा हजारांवर पोहोचली होती. त्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी २३ एप्रिलपासून संपूर्ण राज्यासह मुंबईत लॉक डाऊन जाहीर करण्यात आले होते. मात्र कोविडचा पॉझिटीव्हीटी दर दहापेक्षा कमी असलेल्या महापालिकांच्या हद्दीत शिथीलता आणण्याचे अधिकार संबंधित पालिकांना देण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबई महापालिकेने सोमवारी सुधारित नियमावली जाहीर केली आहे. आतापर्यंत अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र आता ही वेळ वाढवून दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी महापालिकेने दिली आहे. 

दुकानांचे वेळापत्रक... 

पहिला आठवडा - रस्त्याच्या उजव्या बाजूची दुकाने सोमवार, बुधवार व शुक्रवारी सुरु ठेवण्याची परवानगी असेल.

डाव्या बाजूची दुकाने -  मंगळवार, गुरुवारी अशी दोन दिवस सुरु राहतील.

पुढील आठवडा - रस्त्याच्या डाव्या बाजूची दुकाने सोमवार, बुधवार व शुक्रवारी सुरु राहातील. तर उजव्या बाजूची दुकाने मंगळवार, गुरुवार 

वेळ : सकाळी ७ ते दुपारी दोन 

  • ई-कॉमर्स अंतर्गत अत्यावश्यक वस्तू बरोबर आहे तरी वस्तूंची वितरण करण्यास परवानगी असणार आहे.
  • मात्र सोशल डिस्टंसिंग आणि मास्कचा वापर दुकानांमध्ये अनिवार्य असणार आहे या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे संकेत महापालिकेने दिले आहेत. 
  • मॉल आणि मल्टिप्लेक्स सुरू करण्याबाबतचा निर्णय मात्र लांबणीवर टाकण्यात आला आहे. याबाबत राज्य सरकारचं निर्णय घेईल, असे सूत्रांकडून समजते.
टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईमुंबई महानगरपालिका