भरदिवसा घरफोडी करणारी टोळी अटकेत
By Admin | Updated: August 14, 2014 01:06 IST2014-08-14T01:06:10+5:302014-08-14T01:06:10+5:30
घरफोडी प्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे

भरदिवसा घरफोडी करणारी टोळी अटकेत
नवी मुंबई : घरफोडी प्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चार लाख रुपये किमतीचा चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही टोळी भरदिवसा घरफोड्या करण्यात सराईत असून त्यांच्यावर मुंबईत देखील गुन्हे दाखल आहेत.
घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेचे उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ चे पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांचे पथक कार्यरत करण्यात आले होते. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, पोलीस उपनिरीक्षक भारत जाधव यांच्या पथकाने सापळा रचला होता. या पथकाने चौघा सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. अशरत ऊर्फ शाहरुख शेख (२१), अझर पाशा खान (१९), परशुराम विलास शेंडगे (३२) आणि दीपक दिलीप पतंगे (२०) अशी त्यांची नावे आहेत. हे सर्वजण अंधेरीचे राहणारे असून परशुराम हा नुकताच मुंब्रा येथे रहायला आला होता. या टोळीने मुंबईत एकत्रित भरदिवसा घरफोड्या केल्या आहेत. यापुढे नवी मुंबईत घरफोड्या करण्याचा बेत परशुराम याने आखला होता. त्याप्रमाणे ही टोळी नवी मुंबई क्षेत्रात घरफोड्यांमध्ये सक्रिय असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार मिळालेल्या सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे या टोळीला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून शहरातील ११ गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्यामध्ये कोपरखैरणे विभागातील ५, तुर्भे विभागातील २, नेरुळ विभागातील १, खारघर विभागातील १ घरफोड्यांचा समावेश आहे. या घरफोड्यांमध्ये त्यांनी चोरलेले सोन्याचे दागिने, लॅपटॉप तसेच कॅमेरा असा ४ लाख ११ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे गुन्हे शाखा पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले.
चोरट्यांनी चोरीचा हा मुद्देमाल स्वत:चा असल्याचे सांगून ठिकठिकाणच्या ज्वेलर्समध्ये विकला होता. हे चौघेही केबल कर्मचारी अथवा प्लंबर असल्याचे सांगून इमारतींमध्ये प्रवेश मिळवून चोरी करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)