लोकमतच्या ‘आपले बाप्पा’चा ‘अ‍ॅबी अ‍ॅवॉर्ड्स’मध्ये गजर

By Admin | Updated: April 14, 2015 23:41 IST2015-04-14T23:41:52+5:302015-04-14T23:41:52+5:30

विचारांचा जागर करताना त्याला कृतिशीलतेचीही जोड देण्यासाठी ‘लोकमत’ने राबविलेल्या ‘आपले बाप्पा’चा गोवा फेस्टमधील अ‍ॅबी अ‍ॅवॉडर््समध्येही गजर झाला.

Alarm in Lokmat's 'Your Bappa' 'Abby Awards' | लोकमतच्या ‘आपले बाप्पा’चा ‘अ‍ॅबी अ‍ॅवॉर्ड्स’मध्ये गजर

लोकमतच्या ‘आपले बाप्पा’चा ‘अ‍ॅबी अ‍ॅवॉर्ड्स’मध्ये गजर

मुंबई : विचारांचा जागर करताना त्याला कृतिशीलतेचीही जोड देण्यासाठी ‘लोकमत’ने राबविलेल्या ‘आपले बाप्पा’चा गोवा फेस्टमधील अ‍ॅबी अ‍ॅवॉडर््समध्येही गजर झाला. माध्यम आणि जाहिरात क्षेत्रातील ‘आॅस्कर’ मानल्या जाणाऱ्या या अवॉर्डवर मोहोर उमटवून ‘लोकमत’च्या या अभिनव कल्पनेची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.
जाहिरात क्षेत्रातील सर्जनशीलतेला दाद देण्यासाठी अ‍ॅहव्हर्टायझिंग एजन्सीस असोसिएशन आॅफ इंडिया आणि द अ‍ॅड क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार प्रदान केले जातात. गेल्या वर्षीपासून यामध्ये प्रकाशकांनाही सामावून घेण्यात आले आहे. पहिल्याच वर्षी पुरस्कार पटकावून ‘लोकमत’ने मराठी वृत्तपत्रसृष्टीच्या इतिहासात गौरवाचे स्थान मिळविले आहे. ‘आपले बाप्पा’ हा उपक्रम गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या काळात राबविला गेला. ‘लोकमत’ने ‘आपले बाप्पा’ व्यासपीठावरून विविध उपक्रम राबविले. विद्यार्थी, महिला, गणेश मंडळे, महापालिका कर्मचारी आणि नागरिकांनी या उपक्रमात भरभरून प्रतिसाद दिला.

गणेशोत्सव ‘इको फ्रेंडली’ होण्यासाठी विविध ठिकाणी ‘श्रीगणेश यात्रा’ या जनजागृती फेरी काढल्या. प्लास्टर आॅफ पॅरिसऐवजी शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकाराव्यात, निर्माल्य कलशातच टाकावे यासाठी जनजागृती करण्यात आली. ‘लोकमत’च्या संकल्पनेने भारावून जाऊन अनेक स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने नदीच्या घाटांवर जागल्याची भूमिका बजावली. पुणे महापालिकेनेही एक पाऊल पुढे टाकत निर्माल्यकलश उपलब्ध करून दिले. त्यामुळे नदीचे प्रदूषण टळले गेले.

नव्या विचाराला ‘लोकमत’ने नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. समाजहितासाठी आक्रमक पत्रकारिता करतानाच विधायक दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबविले आहेत. ‘लोकमत’ची ‘आपले बाप्पा’ ही संकल्पना विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठीची एक चळवळ बनली याचा आनंद आहे. गोवा फेस्टमध्ये कृतिशील प्रकाशकांच्या वर्गवारीत झालेला या संकल्पनेसाठी झालेला ‘लोकमत’चा गौरव वैचारिक आदान-प्रदान आणि जनजागरणाच्या परंपरेला मिळालेली पावती आहे.
- ऋषी दर्डा, संपादकीय संचालक, लोकमत

गणेशोत्सवातून जोडली मने
पाककलेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘आपले बाप्पा’ उपक्रमांतर्गत मोदक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. घरगुती गणपतीचीही विलोभनीय सजावट करण्यात पुणेकर गणेशभक्त मागे नाहीत. ‘घरगुती गणपती आरास स्पर्धेत’ हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. घरगुती पर्यावरणपूरक गणपती आरास स्पर्र्धेत हजारो नागरिकांनी शाडू मातीच्या श्रींच्या मूर्तीचीच प्रतिष्ठापना केली.

‘आपले बाप्पा’ उपक्रमातील क्रांतिकारी पाऊल म्हणजे महिलाशक्तीला सन्मान देणारा ‘ती’चा गणपती. ‘लोकमत’ने पुरोगामित्वाच्या भूमिकेला बळ देतानाच सामाजिक, सांस्कृतिक भान ठेवले आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला; मात्र महिलांच्या रूपाने अर्धे जग त्यापासून वंचित होते. ‘ती’चा गणपती उपक्रमाने गणेशोत्सव आणखी समाजाभिमुख होऊन लोकमान्यांच्या परंपरेतील पुढचे पाऊल पडले. पौरोहित्यापासून ते आरतीपर्यंत सर्व विधी महिलांच्या हस्ते करतानाच महिलांच्या विचाराला व्यासपीठ देणारी ‘ती’चा गणपती हीदेखील एक चळवळ म्हणून पुढे आली.

शालेय जीवनात मिळालेली संस्कारांची शिदोरी आयुष्यभर त्यांच्याजवळ राहते. याचा विचार करून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सुमारे १०० शाळांतील हजारो विद्यार्थ्यांना शाडूपासून मूर्ती साकारण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

बाप्पांची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड
रेकॉर्ड्समध्ये नोंद
सर्व कलांची देवता असलेल्या लाडक्या बाप्पाचे अलौकिक रूप प्रत्येकाच्या मनात कायमस्वरूपी कोरले गेले आहे. मनातील हे रूप कागदावर रेखाटण्याची संधी ‘लोकमत’ने हजारो विद्यार्थ्यांना करून दिली. दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ठिपक्यांच्या जोडणीतून कागदावर गणपती साकारला आणि हा विक्रम ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंदला गेला.

 

Web Title: Alarm in Lokmat's 'Your Bappa' 'Abby Awards'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.