अक्षय तृतीयेला खरेदीची धूम

By Admin | Updated: April 21, 2015 23:03 IST2015-04-21T23:03:55+5:302015-04-21T23:03:55+5:30

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आज हजारो ग्राहकांनी सोने-चांदी, हिरे, वाहने, घरे, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू यांची खरेदी केली.

Akshay Tritiya's Purchase Dhoom | अक्षय तृतीयेला खरेदीची धूम

अक्षय तृतीयेला खरेदीची धूम

वसई : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आज हजारो ग्राहकांनी सोने-चांदी, हिरे, वाहने, घरे, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू यांची खरेदी केली. सर्वात जास्त गर्दी ही सराफांच्या दुकानांमध्ये होती. त्याखालोखाल इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व नंतर वाहनांच्या शोरुममध्ये अशीच ग्राहकांची गर्दी होती. गारपीट, अवकाळी पाऊस, पाणीटंचाई, अशी प्रतीकूलता असली तरी त्याचा कोणताही विपरित परिणाम अक्षयतृतीयेला असणाऱ्या खरेदीच्या उत्साहावर झालेला नव्हता.
वर्षभरात साडेतीन दिवस शुभ मानण्यात येतात. गुढीपाडवा, विजयादशमी, कार्तिक प्रतिपदा व अक्षय तृतीया हे सण होय. या दिवशी कोणत्याही शुभकार्याची सुरूवात केल्यास त्यात यश मिळते. अक्षय तृतीया ही पंचांगात महत्वाची तिथी मानली जाते. या दिवसाचे महत्व म्हणजे कुबेर शिवाची प्रार्थना करून प्रसन्न करतो व देवी लक्ष्मीच्या संपत्तीचे संरक्षक म्हणून स्वत:चे स्थान प्राप्त करून घेतो. जे आपल्याकडे आहे ते इतरांना दिल्याने अधिक आपल्याला धन प्राप्त होते असे सांगितले जाते. या दिवशी मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीची खरेदी करण्यात येते. श्री विष्णुसहीत वैभव लक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजनही करण्यात येते. आज सकाळपासूनच वसई-विरार, डहाणू, पालघर, बोईसर, जव्हार, मोखाडा परिसरातील अनेक सराफाच्या दुकानात सोने खरेदीसाठी झुंबड उडाली होती. या दिवशी वसई-विरारच्या सराफा बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होत असते. यंदाही ही उलाढाल मोठ्या प्रमाणात झाली.
वैशाख महिन्यातील शुद्ध तुतीयेचा गुढीपाडवा, दसरा, कार्तिक शुद्ध प्रतिपदा आदी साडेतीन शुभ मुहूर्तात समावेश आहे. हे दिवस घर, वाहन, जमीन, सोने, कपडे आदी खरेदी तसेच गृहशांती आणि लग्न कार्याकरिता शुभ मानले जातात. हिंदु धर्मातील सर्व उत्सव शेतीशी निगडीत आहेत. अक्षयतृतीयेपासून चाळीस दिवसांनी पाऊस पडतो, अशी आजही शेतकऱ्यांची धारणा आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Akshay Tritiya's Purchase Dhoom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.