धारावी पुनर्वसन प्रकल्पास आक्सा गावकऱ्यांचा विरोध, मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना हुसकावले
By मनोहर कुंभेजकर | Updated: January 16, 2025 17:35 IST2025-01-16T17:35:02+5:302025-01-16T17:35:27+5:30
Dharavi Project: धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी जमिनींची मोजणी करण्याकरिता मालाड पश्चिम येथील आक्सा गावामध्ये आलेल्या नगर भूमापन अधिकाऱ्यांना आज गावकऱ्यांनी स्थानिक आमदार व माजी मंत्री अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत हुसकावून लावले.

धारावी पुनर्वसन प्रकल्पास आक्सा गावकऱ्यांचा विरोध, मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना हुसकावले
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी जमिनींची मोजणी करण्याकरिता मालाड पश्चिम येथील आक्सा गावामध्ये आलेल्या नगर भूमापन अधिकाऱ्यांना आज गावकऱ्यांनी स्थानिक आमदार व माजी मंत्री अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत हुसकावून लावले. यावेळी गावकरी प्रचंड आक्रमक झाले. जमीन मोजणीसाठी सकाळी ९.३० ची वेळ देऊन प्रत्यक्षात मात्र सकाळी ६ वाजताच प्रचंड पोलीस बंदोबस्तात व गावकऱ्यांना अंधारात ठेऊन भूमापन अधिकाऱ्यांनी जमीन मोजणी सुरु केल्याने गावकरी संतप्त झाले. गावकऱ्यांनी काही काळ मढ-मार्वे मार्ग रोखून धरला. कोणत्याही परिस्थितीत भूमिपुत्रांच्या हक्काच्या जमिनी अदानीच्या घशात जावू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका आमदार अस्लम शेख यांनी घेतली.
गावकऱ्यांना अंधारात ठेऊन केलेला सर्वे रद्द करा, अन्यथा भूमापन अधिकारी रणजित देसाई यांना जावू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका आमदार अस्लम शेख यांनी घेतल्याने मालवणी पोलीस स्थानकाबाहेर देखील बराच काळ तणाव निर्माण झाला होता. यातील काही जमिनीबाबत श्री मुक्तेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी व राज्यसरकार यांच्यामध्ये न्यायालयात वाद असताना व या जमिनीवर कोणतीही कार्यवाही करु नये, असे न्यायालयाचे स्पष्ट आदेश असताना देखील या जमीनीची मोजणी केली केयाने गावकऱ्यांनी यावर आक्षेप घेत, नगर भूमापन अधिकाऱ्यांना या मुद्द्यावरुन घेरले.
नगर भूमापन अधिकाऱ्यांनी जमिनीची मोजणी झाली नाही असे लिखित स्वरुपात देण्याचे कबूल केल्याने ग्रामस्थ शांत झाले.