Join us  

'आमच्या बहिणीच, पण...' आशा वर्कर्सच्या मागणीचा प्रश्न विधानसभेत; अजित पवार स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 11:29 AM

विरोधी पक्षनेत्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी, आशा वर्कर यांच्या आंदोलनावर भाष्य केले

मुंबई - राज्यात आरक्षणाच्या प्रमुख मागणींसह इतरही मागण्यासाठी आंदोलने सुरू आहेत. मुंबईतील आझाद मैदानात १० फेब्रुवारीपासून आशा वर्कर्सच्या संघटनेचं पगार वाढीचा अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्यापही सरकारच्यावतीने आंदोलनाची कुठलीही दखल घेतली जात नसल्याने आंदोलक महिलांना संताप व्यक्त केला. तसेच, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक मुंबईतील धरणे आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. त्याच अनुषंगाने आज विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर, अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले. 

मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या आशा वर्कर्सच्या आंदोलनासाठी कुणी नाशिकवरून आलंय, कुणी मराठवाड्यातून आलंय तर कुणी विदर्भातून. राज्यभरातून आलेल्या या महिलांची एकच मागणी आहे. 'तीन महिन्यांपूर्वी आम्हाला आमचं आंदोलन संपवण्यासाठी म्हणून दिलेलं लेखी आश्वासन सरकारने पूर्ण करावं, तसा शासनादेश काढावा.', अशी मागणी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची आहे. त्याच मागणीच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. 

अंगणवाडी सेविका व आशा वर्करच्या मागणीवरुन विरोधक सभागृहात आक्रमक झाल्याचं दिसून आलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या आशा वर्करच्या आंदोलनावर विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. आया-बहिणी घरदार सोडून गेल्या कित्येक दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत, सरकार त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देणार आहे का, त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, असे वडेट्टीवार यांनी म्हटले होते. 

विरोधी पक्षनेत्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी, आशा वर्कर यांच्या आंदोलनावर भाष्य केले. आशा वर्कर यांची मुख्यमंत्र्यानीही भेट घेतली, त्यांच्या मागणीनुसार आंदोलकांनी चर्चेला पुढे यायला हवं. चर्चेतून मार्ग निघत असतो, आंदोलकांनी थोडं पुढं-मागं व्हावं... शेवटी आपल्या इतरही आर्थिक बाजूंचा विचार करावा लागतो. आशा वर्कर्स ह्या आमच्या बहिणीच आहेत, जर सरकार दोन पाऊले मागे येत आहे, मग तुम्हीही दोन पाऊलं मागे यायला हवं, असे म्हणत आशा वर्कर आंदोलनावर अजित पवार यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे, आशा वर्कर्सच्या मागणीनुसार तोडगा निघाणार की नाही, हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, राज्यात राष्ट्रीय आरोग्य मिशनने दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातही 70 हजारांपेक्षा जास्त महिला आशा स्वयंसेविका म्हणून काम करतात.

१० फेब्रुवारीपासून आझाद मैदानातच

हजारो आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी १२ जानेवारीपासून राज्यभरात संप पुकारला आहे. ९ फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आंदोलक आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी ठाणे गाठलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी ठाण्यात आलेल्या आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांना मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही निर्णय घेऊ. मात्र, त्यानुसार कारवाई होत नसल्याने हजारोंच्या संख्येने ठाण्यात आलेल्या या आंदोलक महिलांनी मुंबईचं आझाद मैदान गाठलं आणि १० फेब्रुवारीपासून तिथेच धरणे आंदोलन सुरु केलं आहे.

टॅग्स :अजित पवारमुंबईविधानसभा