आरोपात तथ्य आढळले तर राजीनामा : अजित पवार

By Admin | Updated: August 11, 2014 22:40 IST2014-08-11T22:25:50+5:302014-08-11T22:40:48+5:30

आरोप खोटे ठरल्यास फडणवीसांनी राजकारण सोडावे

Ajit Pawar resigns if facts are found: Ajit Pawar | आरोपात तथ्य आढळले तर राजीनामा : अजित पवार

आरोपात तथ्य आढळले तर राजीनामा : अजित पवार

सांगली : गारपीटग्रस्तांची नुकसानभरपाई लाटल्याचा आरोप चुकीचा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तो सिद्ध केल्यास मी पदाचा राजीनामा देईन. त्यात तथ्य आढळले नाही, तर फडणवीसांनी राजकारण सोडावे, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिले.
ते म्हणाले की, गारपीटग्रस्त भागांचे सर्वेक्षण चालू झाले, त्यावेळी बारामतीत आलेल्या अधिकाऱ्यांना मीच सांगितले होते की, आमच्या शेतीचे नुकसान झाले असले तरी, त्याकडे लक्ष न देता इतर शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. त्यावेळी स्पष्टपणे आम्ही मदत नाकारली होती. तरीही अशापद्धतीचे आरोप होत आहेत. त्यांनी केलेला आरोप तथ्यहीन आहे. ते धादांत खोटे बोलत आहेत. केंद्रात सत्ता असलेल्या एका पक्षाचे महत्त्वाचे पद असूनही फडणवीस बेजबाबदारपणे बोलत आहेत. फडणवीसांनी आरोप सिद्ध केल्यास मी लगेच राजीनामा देण्यास तयार आहे, अन्यथा त्यांनी राजकारण सोडावे.
विधानसभा निकालाबाबतच्या अंदाजाबाबत ते म्हणाले की, ‘स्कायलॅब’ पडणार म्हणून अफवा उठल्या. त्यावेळी माझ्या काही मित्रांनी खात्यावरच्या मोठ्या रकमा काढण्यास सुरुवात केली होती. त्यांना त्याचे कारण विचारल्यानंतर त्यांनी स्कायलॅबची भविष्यवाणी सांगितली. संकट येणार म्हणून आयुष्याचा आनंद लुटण्यासाठी अनेकांनी पैसे उधळले. प्रत्यक्षात असे काहीही घडले नाही. काही वर्षांपूर्वी भाजपनेही ‘इंडिया शायनिंग’चा असाच गाजावाजा केला, मात्र त्याचे प्रत्यक्ष परिणाम काहीही झाले नाहीत. विधानसभा निवडणुका जवळ येत असताना सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांकडून निकालाविषयीचे अंदाज व्यक्त होत आहेत. अशा आकड्यांना अर्थ नाही. भविष्यावर विश्वास ठेवायला लागलो तर राष्ट्रवादीचे निर्धार मेळावे बंद करून सर्वांना घरी बसावे लागेल. जागावाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आमच्या पद्धतीने आम्ही समसमान ‘फॉर्म्युला’ सुचविला होता.
राज्यातील पाण्याची परिस्थिती काही भागात चांगली व काही भागात गंभीर आहे. अजूनही मराठवाड्यातील पाच धरणांमध्ये अजिबात पाणी नाही. त्यामुळे टंचाईच्या उपाययोजनांना मुदतवाढ देण्यात आली आहे. आपत्ती निवारणासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात आला आहे. याच गोष्टीला प्राधान्य द्यायला हवे, पण विकास कामेही व्हावीत, यासाठी शासन दक्षता घेत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ेएका म्यानात एकच तलवार
पक्षातून जे लोक बाहेर पडत आहेत, त्यांचा तो व्यक्तिगत निर्णय आहे. एका मतदारसंघात एकालाच संधी मिळते. एकाच म्यानात दोन तलवारी बसू शकत नाहीत. त्यामुळे ते बाहेर जात आहेत, असे मत पवार यांनी व्यक्त केले.
तो मुद्दा जुना झाला
मुख्यमंत्र्यांच्या कारभाराबाबत राष्ट्रवादी नेत्यांकडून झालेल्या टीकेबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, तो मुद्दा जुना झाला. किती दिवस तो धरून बसणार आहात?

Web Title: Ajit Pawar resigns if facts are found: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.