अजित पवारांनाच मागितला टोल
By Admin | Updated: November 24, 2014 00:27 IST2014-11-24T00:27:26+5:302014-11-24T00:27:48+5:30
शिरोली टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांनी अडवली गाडी

अजित पवारांनाच मागितला टोल
कोल्हापूर : नातेवाइकांच्या कार्यक्रमासाठी कोल्हापुरात आलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गाडी अडवण्याचा प्रकार शिरोली टोलनाक्यावर आज, रविवारी रात्री घडला. या घटनेची वाहनधारकांमधून जोरदार चर्चा सुरू होती.
अजित पवार हे रात्री आठच्या सुमारास नातेवाइकांचा घरगुती कार्यक्रम आटोपून शिरोली टोलनाका येथे आले असता तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांची गाडी अडविली. यावेळी कर्मचाऱ्यांनी चालकाकडून टोलची मागणी केली असता चालकाने टोल देण्यास नकार दिला. त्यानंतर चालक व टोलवरील कर्मचाऱ्यांत शाब्दिक चकमक झाली. हा प्रकार पाहून गाडीत बसलेले अजित पवार खाली उतरले आणि सगळ्यांचीच बोलती बंद झाली. नाक्यावर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस कर्मचारीही याठिकाणी तातडीने धावत आले. यावेळी पवार यांना पाहून कर्मचाऱ्यांसह पोलिसांनाही काही वेळ सुचेनासे झाले. आपली चूक लक्षात येताच कर्मचाऱ्यांसह सुपरवायझरची भंबेरी उडाली. अखेर कर्मचाऱ्यांनी माफी मागितल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.
दरम्यान, हे वृत्त वाहनधारकांकडून शहरात पसरले. याबाबत पोलिसांसह टोलनाक्यावर चौकशी केली असता या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
लाल दिवा गेला अन्...
सत्तेवर आल्यास शंभर दिवसांत कोल्हापूरचा टोल प्रश्न सोडवू, अशी भीष्मप्रतिज्ञा केलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीच गाडी आज कोल्हापुरातील शिरोली टोलनाक्यावर अडविली. त्यामुळे गाडीवरील लाल दिवा गेल्यानंतर आणि पोलिसांचा लवाजमा हटल्यानंतर काय प्रचिती येते, याचा अनुभव आज खुद्द पवार यांनीच घेतल्याची चर्चा होती.