अजय देवगणची साक्ष कोर्टातच होणार
By Admin | Updated: January 6, 2015 01:18 IST2015-01-06T01:18:04+5:302015-01-06T01:18:04+5:30
सर्वोच्च न्यायालयानेही सोमवारी फेटाळल्याने ‘सिंघम रिटर्नस’ फेम बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यास आता साक्षीसाठी जातीने न्यायालयात हजर होण्यावाचून पर्याय राहिलेला नाही.

अजय देवगणची साक्ष कोर्टातच होणार
याचिका फेटाळली : आॅफिस खाली करण्यासंबंधीचे प्रकरण
नवी दिल्ली : मुंबईतील आॅफिसची जागा खाली करण्यासंबंधी जागामालकाने दाखल केलेल्या दाव्यात आपली उलट तपासणी प्रत्यक्ष कोर्टात न जाता अन्य पर्यायी मार्गाने नोंदविली जावी यासाठी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानेही सोमवारी फेटाळल्याने ‘सिंघम रिटर्नस’ फेम बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यास आता साक्षीसाठी जातीने न्यायालयात हजर होण्यावाचून पर्याय राहिलेला नाही.
‘हे काय चाललं आहे? तुम्हाला कोर्टात हजर होण्यात काय अडचण आहे? तुम्हाला हजर व्हावेच लागेल’, असे सांगून न्या. व्ही. गोपाळ गौडा व न्या. आर. भानुमती यांच्या खंडपीठाने देवगणने केलेली विशेष अनुमती याचिका फेटाळली.
अजय देवगण व विपुल भिकालाल संघवी यांचे मुंबईत दादासाहेब भडकमकर मार्गावर नाझ सिनेमाच्या इमारतीत कार्यालय आहे. ती इमारत मझदा थिएटर्स प्रा.लि. यांच्या मालकीची आहे. कार्यालय खाली करण्यासाठी जागामालकाने लघुवाद न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला आहे. त्यात आपली उलट तपासणी प्रत्यक्ष न्यायालयात न घेता ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ने किंवा न्यायालयाने अधिकारी नेमून नोंदवावी, अशी विनंती देवगण याने केली होती. लघुवाद न्यायालयानंतर उच्च न्यायालयानेही ती अमान्यकेल्याने देवगण सर्वोच्च न्यायालयात आला होता.
अजय देवगण याने याचिकेत म्हटले होते की, १५ एप्रिल रोजी आपण उलट तपासणीसाठी लघुवाद न्यायालयात हजर राहिलो होतो. पण त्यावेळी साक्ष नोंदविमे शक्य झाले नाही. (विशेष प्रतिनिधी)
कोर्टात साक्ष देणे अडचणीचे
कोर्टात जातीने हजर राहून साक्ष देणे अडचणीचे आहे, असे सांगताना अजय देवगण याचे असे म्हणणे होते की, मी लोकप्रिय अभिनेता असल्याने कोर्टात आल्यावर चाहत्यांची मोठी गर्दी होते. १५ एप्रिल रोजीसुद्धा तसेच झाले व चाहत्यांच्या गर्दीमुळे न्यायालयाचे काम सुरळितपणे चालणे कठिण झाले. पुन्हाही तसेच होईल, अशी भीती आहे. शिवाय अशा गर्दी व गोंधळाच्या वातावरणात कदाचित योग्यपणे साक्ष न देता आल्याने अखेरीस माझ्यावरच अन्याय होईल, असे मला वाटते.