Join us
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ऐश्वर्या, आराध्या बच्चनची कोरोनावर मात; मायलेकींना रुग्णालयातून डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 16:38 IST

CoronaVirus News: अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांच्यावर अद्याप उपचार सुरू

मुंबई: अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि तिची कन्या आराध्या बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत. ऐश्वर्या आणि आराध्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती अभिषेकनं ट्विट करून दिली. त्यानं ट्विटमधून प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचे आभारदेखील मानले आहेत. अभिषेक बच्चननं वडील अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीची माहितीदेखील ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. 'सध्या तरी दोघांवर रुग्णालयातच उपचार सुरू राहणार आहेत. ऐश्वर्या आणि आराध्या यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानं त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे,' असं अभिषेकनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन आणि आराध्या बच्चन यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. अभिषेक आणि अमिताभ बच्चन यांनी याबद्दलची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. कालच अमिताभ बच्चन यांनी रुग्णालयातून एक पोस्ट शेअर केली होती. कोरोना रुग्णांवर कसे उपचार केले जातात, याची माहिती त्यांनी पोस्टमधून दिली होती. 'कोरोना रुग्णांना रुग्णालयात वेगळ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात येतं. त्यामुळे तो कित्येक दिवस इतरांना पाहू शकत नाही. डॉक्टर आणि परिचारिका येतात. औषधं देतात. मात्र ते कायम पीपीई किटमध्ये असतात. कोणत्याही रुग्णाला त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा चेहरा पाहता येत नाही,' अशा शब्दांत अमिताभ यांनी त्यांचा अनुभव शेअर केला होता.अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांना वैद्यकीय देखरेखीखाली असून त्यांना याच आठवड्यात डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. अभिषेक आणि अमिताभ यांना ११ जुलैला कोरोनाची लागण आली. यानंतर दुसऱ्याच दिवशी ऐश्वर्या आणि आराध्या यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. या दोघींना सुरुवातीला होम क्वारंटाईनमध्ये राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानंतर त्यांना १७ जुलैला नानावटीमध्ये दाखल करण्यात आलं.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याऐश्वर्या राय बच्चनअमिताभ बच्चनअभिषेक बच्चन