- मनोज गडनीस मुंबई - वैमानिक होण्यासाठी जे आंतरराष्ट्रीय नियम आहेत त्यानुसार संबंधित उमेदवाराकडे किमान २०० तास विमान उडविण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्यानंतरच त्याला व्यावसायिक वैमानिकाचा परवाना मिळून तो उड्डाण करण्यासाठी सज्ज होतो.
शिक्षण, फिटनेस आणि प्रशिक्षण महत्त्वाचेज्या उमेदवारांनी विज्ञान शाखेत १२ वीचे शिक्षण घेतले आहे आणि ज्याने वयाची १७ वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांना वैमानिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेता येतो. मात्र, संबंधित उमेदवार वैद्यकीय दृष्ट्या संपूर्णपणे फिट असावा लागतो. वैमानिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्याला तिथे ८ ते १० महिन्यांचे प्रशिक्षण घ्यावे लागते. हे प्रशिक्षण तीन टप्प्यांमध्ये होते. पहिल्या टप्प्यामध्ये ८० तासांचे शिक्षण दिले जाते. त्यानंतर सिम्युलेटर ट्रेनिंग आणि प्रत्यक्ष उड्डाणाचे प्रशिक्षण असे २०० तासांचे शिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणादरम्यान हवाई वाहतुकीचे नियम, दिशादर्शनाचे शिक्षण, विमानाचे तांत्रिक परीक्षण, रेडिओ तंत्रज्ञान आणि विमान उड्डाण यांवर विशेष भर दिला जातो. प्रत्यक्ष विमान उड्डाण प्रशिक्षणातदेखील विशिष्ट टप्प्यांत प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये प्रशिक्षकासोबत विमान उड्डाण शिकणे, एकट्याने विमान चालवणे, एअरपोर्ट ते एअर पोर्ट विमान चालवणे आणि रात्री विमान चालवणे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत.
हवाई दल वैमानिकांना मागणीहवाई दलात प्रशिक्षण घेतलेल्या वैमानिकांना अत्यंत कठोर प्रशिक्षण दिले जाते. तसेच अनेक संकटकालीन परिस्थितीत उड्डाण कसे करावे याचेदेखील प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे हवाई दलातून वैमानिक निवृत्त झाले की त्यांना नोकरीवर ठेवण्यासाठी विमान कंपन्या नेहमीच प्राधान्य देतात. राजकीय नेते, कॉर्पोरेट क्षेत्रातील बडे लोक ज्या चार्टर विमान किंवा हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात, त्यांच्या उड्डाणकरिता देखील चार्टर कंपन्या या हवाई दलातील वैमानिकांना प्राधान्य देतात.
अनुभव असला तरी सिम्युलेटर प्रशिक्षण महत्त्वाचे वैमानिकाचा अनुभव हा त्याने किती वर्षे त्या क्षेत्रात काम केले यावरून ठरत नाही, तर त्याने किती तास विमानाचे उड्डाण केले आहे त्यावरून त्याचा अनुभव निश्चित होतो. एक वैमानिक वर्षाकाठी एक हजार तासांपर्यंत विमान उड्डाण करू शकतो. मात्र, एखाद्या वैमानिकाला कितीही हजार तासांचा अनुभव असला तरी निर्धारित नियमांनुसार संबंधित वैमानिकाला वर्षातून एकदा तरी सिम्युलेटरवर प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे. या सिम्युलेटरमध्ये विमान प्रवासात येणाऱ्या अकल्पित परिस्थितीचा आभास निर्माण केला जातो आणि ती परिस्थिती वैमानिक कशी हाताळतो याचा वेध घेतला जातो. विमान निर्मिती करणाऱ्या कंपन्यांतर्फे अनेक अद्ययावत विमानांची निर्मिती होते. एखाद्या वैमानिकाकडे अनुभव असला तरी नवीन विमान हाताळण्यापूर्वी त्याला त्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते.
त्यांना वैमानिक होता येते का?ज्या विद्यार्थांनी कला व वाणिज्य शाखेतून १२ वीचे शिक्षण घेतले आहे, त्यांनादेखील वैमानिक प्रशिक्षण घेता यावे, यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातर्फे नियमात बदल करण्याचा विचार सुरू आहे. चालू वर्षाखेरीपर्यंत यावर निर्णय अपेक्षित आहे.