पश्चिम उपनगरात प्रचाराची हवा अद्याप थंडच

By Admin | Updated: February 17, 2017 02:30 IST2017-02-17T02:30:32+5:302017-02-17T02:30:32+5:30

मुंबईतील तापमानात वाढ होत असताना महापालिका निवडणुकीच्या रणांगणामुळे राजकीय पक्ष व उमेदवारांमध्ये लगीनघाई सुरू आहे.

The air in the western suburbs is still cool | पश्चिम उपनगरात प्रचाराची हवा अद्याप थंडच

पश्चिम उपनगरात प्रचाराची हवा अद्याप थंडच

जमीर काझी / मुंबई
मुंबईतील तापमानात वाढ होत असताना महापालिका निवडणुकीच्या रणांगणामुळे राजकीय पक्ष व उमेदवारांमध्ये लगीनघाई सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात ज्याच्या जिवावर हे मैदान मारण्याचे बोलले जात आहे तो ‘मतदारराजा’ मात्र अद्याप या गडबडीपासून अलिप्तच असल्याचे चित्र आहे.
उमेदवार, त्यांचे मोजके कार्यकर्ते आणि पदयात्रेसाठीची कुमक वगळता सर्वसामान्य नागरिक मात्र निवडणुकीच्या ज्वरापासून दूर असल्याचे पश्चिम उपनगरात मारलेल्या फेरफटक्यातून दिसून आले. पदयात्रेतून भेटीसाठी आलेल्या उमेदवाराला नमस्कार, शुभेच्छा देण्याची औपचारिकता पार पाडत नोकरदार, व्यापारी वर्ग आणि गृहिणी आपापल्या कामात व्यस्त होत आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाची टक्केवारी फारशी वाढणार नसल्याची शक्यता दस्तुरखुद्द उमेदवार व कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
पश्चिम उपनगरातील कांदिवली, चारकोप, बोरीवली, मालाड, गोरेगाव या भागात सेना, भाजपाच्या नेत्यांच्या सभा झाल्या. मात्र अद्यापही प्रचाराचा ‘माहौल’ तयार झालेला नाही. त्या-त्या ठिकाणचे नित्य व्यवहार सुरळीतपणे सुरू आहेत. निवडणुकीचा ज्वर अजून म्हणावा तसा चढलेला नाही. उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने दुपारी बारानंतर रस्ते, बाजारपेठ व दुकानातील वर्दळ रोडावत चालली आहे. त्यामुळे
बहुतांश उमेदवार सकाळी नऊ, सव्वानऊला पदयात्रेला सुरुवात करत आहेत.
अनेकदा उमेदवार अवघे १५-२० कार्यकर्ते सोबत घेऊन मतदारसंघाचा फेरफटका मारत आहेत. दुपारी साडेबारा, एक व त्यानंतर सायंकाळी साडेचार ते नऊपर्यंत दोन टप्प्यांमध्ये मतदारांशी पदयात्रेद्वारे पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. पक्षाच्या नेत्यांच्या प्रचारसभा, रॅलीला सर्वसामान्य नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने उमेदवारांनी ‘डोअर टू डोअर’ प्रचारावर भर दिला आहे. माघारीची मुदत संपून आठवडा उलटून गेल्याने कॉलनी, हाऊसिंग सोसायटी, झोपडपट्टीचा बहुतांश भाग पिंजून काढल्याचे बहुतांश प्रमुख पक्षांच्या उमेदवारांकडून सांगण्यात आले.
मालाड, पी-एस वॉर्डमधील कांदिवली, एस.व्ही. रोड, एम.व्ही. रोड, व्हिलेज, चारकोप गाव, बोरीवली या भागात सकाळच्या सत्रात प्रमुख उमेदवारांच्या पदयात्रांमध्येही कार्यकर्त्यांत फारसा उत्साह नव्हता. त्यांच्या घोषणांमध्येही फारसा दम जाणवत नव्हता. नागरिकांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून निवडणुकीचा कल सांगण्यामध्ये उत्सुकता नव्हती, बघूया अद्याप आठवडाभराचा अवधी आहे, त्या वेळी ठरवू, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
जसजशी मतदानाची तारीख जवळ येईल, त्याप्रमाणे निवडणुकीचे वातावरण निर्माण होईल, असा आशावाद वर्तविण्यात येत आहे. कितीही प्रचार केला तरी पश्चिम उपनगरातील मतदान ५० ते ५५ टक्क्यांवर जाणार नाही, अशी शक्यता प्रचारफेऱ्यांमधील कार्यकर्तेच व्यक्त करत आहेत.

Web Title: The air in the western suburbs is still cool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.