Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विमानतळावर हवाई वाहतुकीचा विलंब होण्याचे प्रमाण घटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 06:06 IST

नेहमी विमान वाहतुकीला होणाऱ्या विलंबामुळे चर्चेत असलेल्या मुंबई विमानतळावरील हवाई वाहतुकीमध्ये होणारा विलंब आता २० टक्क्यांपेक्षा खाली आला आहे.

मुंबई : नेहमी विमान वाहतुकीला होणाऱ्या विलंबामुळे चर्चेत असलेल्या मुंबईविमानतळावरील हवाई वाहतुकीमध्ये होणारा विलंब आता २० टक्क्यांपेक्षा खाली आला आहे. गेल्या काही वर्षांतील ही अत्यंत चांगली कामगिरी आहे. आॅगस्ट महिन्यातील हवाई वाहतुकीला विलंब होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे.आजपर्यंत साधारणत: मुंबई विमानतळावरील सुमारे ५० टक्के विमानांच्या उड्डाणांना व आगमनाला विलंब होत होता. या वेळी मात्र त्यात सकारात्मक बदल झाला आहे. आॅगस्ट महिन्यात विमानतळावर ९ हजार ८३१ विमानांची उड्डाणे झाली, तर ९,८२६ विमानांचे आगमन झाले. त्यापैकी केवळ १९ टक्के विमानांच्या उड्डाणांना विलंब झाला, तर मुंबई विमानतळावर येणाºया विमानांपैकी १६ टक्के विमानांना विलंब झाला.गेल्या काही वर्षांत विलंबाचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा खाली जाण्याी ही पहिलीच वेळ आहे. गतवर्षीच्या आॅगस्ट महिन्यात हे प्रमाण ३५ टक्के होते. विमानतळाच्या हवाई वाहतुकीचा विलंब कमी होण्यासाठी आॅन टाइम परफॉर्मन्स (ओटीपी) कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याद्वारे विमानतळावरील प्रत्येक विमानाच्या आगमन व उड्डाणाशी संबंधित बाबींवर लक्ष ठेवून कोणत्या कारणामुळे विलंब होतो, याची माहिती घेऊन ती कारणे टाळण्यासाठी प्रयत्न केले जातात.सकाळी ९ ते दुपारी ३, दुपारी ३ ते रात्री ९, रात्री ९ ते पहाटे ३ व पहाटे ३ ते सकाळी ९ या चार टप्प्यात वाहतुकीचा अभ्यास करण्यात आला. एकूण होणाºया विलंबापैकी दुपारी ३ ते रात्री ११ या कालावधीत सर्वाधिक विलंब होत असल्याचे समोर आले आहे. फेब्रुवारीत दुपारी ३ ते रात्री ११ या कालावधीतील ८१ टक्के विमानांना विलंब झाला होता. जुलै महिन्यात ९,८९४ विमानांची उड्डाणे झाली होती. त्या तुलनेत आॅगस्टमधील वाहतुकीत घट होऊन, हे प्रमाण ९,८३१ वर गेले म्हणजे ०.६४ टक्के खालावले.खासगी विमानांची उड्डाणे कमी झाल्याने व काही एअरलाइन्सनी त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे काही विमाने सुटली नसल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.५ जून रोजी मुंबई विमानतळावर २४ तासांमध्ये १ हजार विमानांचे वाहतूक व्यवस्थापन करण्यात आले होते. एक धावपट्टी असलेल्या विमानतळांवर ही कामगिरी विक्रमी ठरली होती.

टॅग्स :मुंबईविमानतळ