Join us  

वैमानिक वाहतूक कोंडीत अडकला अन्  प्रवासी दीड तास विमानात ताटकळले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 6:00 PM

मुंबईहून औरंगाबादला जाणाऱ्या एअर इंडियाच्या प्रवाशांचे हाल

मुंबई : शहरातील वाहतूक कोंडीचा अनुभव तुम्हा वारंवार घेतला असेल. मात्र दस्तुरखुद्द वैमानिक वाहतूक कोंडीत अडकल्याने प्रवाशांवर विमानात बसून वैमानिकाची प्रतीक्षा करण्याची वेळ आली. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण करणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील प्रवाशांसोबत हा प्रसंग मंगळवारी घडला. मुंबईहून औरंगाबादला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एआय ४४२ विमानातील प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. एअर इंडियाचे प्रवासी दुपारी ३ वाजता एअरबस ए ३१९ मध्ये बसले. मात्र दीड तास या विमानाचं उड्डाण झालं नाही. अखेर संध्याकाळी ४ वाजून ४५ मिनिटांनी हे विमान आकाशात झेपावले. एअर इंडियाच्या प्रशासनाचा निष्काळजीपणाचा कळस म्हणजे विमान उड्डाणास दीड तासाचा उशीर कशामुळे झाला, याची कोणतीही माहिती देण्याचे सौजन्य दाखवण्यात आले नाही. त्यानंतर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केल्यावर केबिन क्रूंनी वैमानिक वाहतूक कोंडीत अडकल्याने विमानाच्या उड्डाणाला विलंब झाल्याचे हास्यास्पद कारण सांगितले. केबिन क्रूंनी सांगितलेल्या या कारणावर प्रवाशांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले. विमानाचे उड्डाण करण्यापूर्वी वैमानिकाला किमान एक तास आधी विमानतळावर पोहोचणे बंधनकारक आहे.  मात्र आजच्या प्रसंगात विमानाच्या उड्डाणाची वेळ झाल्यानंतर ही वैमानिक विमानतळावर पोहोचू शकला नव्हता. विमानतळावर हजर झाल्यावर वैमानिकाला ब्रेथ अ‍ॅनालायजर चाचणी देणे सक्तीचे आहे. ही चाचणी झाल्यावर एक तासानंतर वैमानिक विमानाचे उड्डाण करु शकतो. 

टॅग्स :एअर इंडिया