मुंबई पोर्ट ट्रस्ट, यलो गेटवर एड्स तपासणी केंद्र

By Admin | Updated: November 30, 2014 23:28 IST2014-11-30T23:28:31+5:302014-11-30T23:28:31+5:30

एड्सचा फैलाव थांबवण्यासाठी आता कामगार,

AIDS Checking Center at Mumbai Port Trust, Yellow Gate | मुंबई पोर्ट ट्रस्ट, यलो गेटवर एड्स तपासणी केंद्र

मुंबई पोर्ट ट्रस्ट, यलो गेटवर एड्स तपासणी केंद्र

पूजा दामले, मुंबई
एड्सचा फैलाव थांबवण्यासाठी आता कामगार, ट्रकचालक, वाहनचालक आणि सेलर यांना या रोगाची बाधा झाली आहे की नाही याची तपासणी आणि जनजागृती मोहीम १ Þडिसेंबरपासून मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटी हाती घेणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि यलो गेट येथे फिरते तपासणी केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
ट्रकचालक हे सतत काही महिने घरापासून, कुटुंबीयांपासून लांब असतात. या वेळी शारीरिक भूक भागवण्यासाठी ते अनेक वेळा वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या संपर्कात येतात. असुरक्षित शारीरिक संबंधातून एचआयव्हीची बाधा होण्याचा धोका जास्त असतो. ट्रकचालकांप्रमाणेच गोदी कामगार, सेलर, जहाजावरील कामगार हेदेखील अनेक महिने फिरतीवर असतात. काही दिवसांसाठी ते बंदरावर येतात आणि नंतर पुढचा प्रवास सुरू करतात. यामुळे काहीच काळ शहरात असल्याने ते आरोग्य तपासणी करून घेत नाहीत. अनेकदा त्यांना एड्ससारखे आजार कशामुळे होतात, होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याचीही माहिती नसते. अशाच कामगारांना लक्ष्य करून जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीने एक तपासणी, समुपदेशन केंद्र मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि यलो गेट येथे सुरू करण्याचे ठरविले आहे, असे सोसायटीच्या अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. श्रीकला आचार्य यांनी सांगितले.
मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि यलो गेट येथे एक व्हॅनदेखील उभी केली जाणार आहे. येथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या साथीने हा उपक्रम राबविला जाणार आहे. प्रशिक्षित अधिकारी त्यांच्या हाताखालच्या कामगारांना एड्सची माहिती देणार आहेत. कामगारांचे वेळापत्रक पाहून तपासणी केंद्र कोणत्या दिवशी ठेवायचे हे निश्चित करण्यात येणार असल्याचे डॉ. आचार्य यांनी सांगितले.
या क्षेत्राप्रमाणेच वाहनचालकांवरदेखील जानेवारी २०१५ पासून लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. मुंबई शहरात अनेक रिक्षा, टॅक्सी आहेत. यांचे चालक हे अनेकदा मुंबई शहराबाहेरचे असतात. यामुळेही हे चालक अनेकदा असुरक्षित शारीरिक संबंध ठेवतात. यामुळे त्यांनाही एड्सची बाधा होण्याचा धोका जास्त असतो. आरटीओबरोबर चर्चा झाली आहे. रिक्षा, टॅक्सी युनियनच्या आधारे या चालकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. या चालकांमध्येही जनजागृती मोहीम आधी राबविली जाणार आहे. यानंतर त्यांच्यासाठीदेखील फिरती तपासणी केंद्रे, व्हॅन दिली जाणार आहे. समाजातील इतर स्तरांवर लक्ष केंद्रित करता येते, मात्र यांच्यापर्यंत पोहोचणे कठीण असते म्हणूनच ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Web Title: AIDS Checking Center at Mumbai Port Trust, Yellow Gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.