लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले ब्रिटिश नागरिक व मूळचे मालाडचे असलेले जावेद अली सय्यद व त्यांच्या कुटुंबावर बुधवारी सायंकाळी मालाड (प.) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
जावेद अली, पत्नी मरियम, चारवर्षीय मुलगा झायान व सहा वर्षीय मुलगा अमानी यांचा अहमदाबाद विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला होता. जावेद यांच्या आईला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्या भेटीसाठी व ईदनिमित्त जावेद व कुटुंबीय जून महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत आले होते. लंडनला परतण्यासाठी मुंबईहून जाणाऱ्या विमानाची तिकिटे उपलब्ध होत नसल्याने त्यांनी अहमदाबाद येथून लंडनला जाण्याचा पर्याय स्वीकारला होता. त्यांचा हा निर्णय जीवघेणा ठरला. लंडनला स्थायिक झालेले जावेद तेथील हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून कामाला होते. दशकभरापूर्वी ते नोकरीसाठी लंडनला गेले व त्यांना तेथील नागरिकत्व मिळाले होते.
बुधवारी दुपारी चार रुग्णवाहिकांमधून चौघांचे पार्थिव आणण्यात आले. मुलगा, सुनेसोबत अद्याप जगही न पाहिलेल्या अवघ्या चार व सहावर्षीय नातवंडांना अखेरचा निरोप देताना जावेदच्या आई, बहिणी व भावाच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी त्यांचे नातेवाईक व समाजबांधवांची मोठी उपस्थिती होती. या दुर्दैवी घटनेबाबत उपस्थितांमधून हळहळ व्यक्त केली जात होती. जावेद गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत आला नव्हता. मात्र, आईच्या आजारपणामुळे व ईद साजरी करण्याचा विचार करून तो आला होता, असे जावेदचे बंधू इम्तियाज यांनी सांगितले.
आईला नव्हती मुलाच्या मृत्युची माहितीहृदयविकाराचा त्रास असल्याने जावेद व त्यांच्या कुटुंबीयांच्या मृत्यूबाबत त्यांच्या आईला सुरुवातीला सांगण्यात आले नव्हते. डीएनए जुळल्यावर आईला माहिती देण्यात आल्याचे सय्यद कुटुंबीयांचे निकटवर्तीय अयूब शेख यांनी सांगितले.