आंदोलन तीव्र होणार
By Admin | Updated: May 27, 2014 04:53 IST2014-05-27T04:53:34+5:302014-05-27T04:53:34+5:30
राज्य सरकारने २००० पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण दिलेले आहे.

आंदोलन तीव्र होणार
मुंबई : राज्य सरकारने २००० पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण दिलेले आहे. असे असताना मुलुंड पूर्व येथील डॉ. आंबेडकर नगर झोपडपट्टी वसाहतीतील १९९५ पूर्वीच्या दीडशे झोपड्या तोडण्यात आल्याचा निषेध म्हणून रहिवाशांनी २१ मेपासून या ठिकाणी उपोषण सुरू केले आहे. मात्र सहा दिवस उलटूनही प्रशासनाने कारवाई न केल्याने मेधा पाटकर यांनी आंबेडकर नगरवासीयांच्या आंदोलनात सहभागी होत हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. झोपडीधारकांच्या समन्वयक पूनम कनोजिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी गृहनिर्माण संस्था २००७ पासून अस्तिवात आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत त्यात एकूण ६४३ झोपडीधारकांचा समावेश आहे. त्यापैकी ३०७ रहिवाशांची विकासकाने संक्र मण शिबिरात राहण्याची व्यवस्था केली आहे तर ११३ रहिवासी पर्यायी व्यवस्थेची वाट पाहत याच झोपड्यांमध्ये राहत होते. त्यांनी दरमहा तीन हजार रुपये भाडे घेऊन अन्यत्र राहण्यास जावे, असा तगादा विकासकाकडून सुरू झाला. इतक्या कमी रकमेत भाड्याने घर मिळणे शक्य नसल्याने झोपडीधारकांनी त्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. याच दरम्यान झोपड्या पाडण्यासाठी उच्च न्यायालयाची परवानगी मिळाली. मात्र राहण्याची पर्यायी व्यवस्था न करताच झोपड्या पाडल्या. विकासक, म्हाडा आणि अतिरिक्त जिल्हाधिकार्यांनी संगनमताने या झोपड्या पाडण्याची कारवाई केली, असा आरोप पूनम कनोजिया यांनी केला आहे. या संस्थेचे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यात पात्र-अपात्र झोपडीधारकांचा निकाल अजून संस्थेला मिळाला नसल्याचे पूनम यांनी सांगितले. सहा दिवस उलटूनही प्रशासन दखल घेत नसल्याने आता मेधा पाटकर यांनी या उपोषणात सहभाग घेतला आहे. आंबेडकर वसाहतीतील लोकांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन तीव्र करणार असल्याचे मेधा पाटकर यांनी जाहीर केले. (प्रतिनिधी)