वृद्ध वीजग्राहकास मारहाण
By Admin | Updated: May 12, 2014 06:17 IST2014-05-12T06:17:57+5:302014-05-12T06:17:57+5:30
आंबा बागायतदाराची झाडे बळजबरीने कापणार्या महावितरणच्या कर्मचार्याला मज्जाव करणार्या वृद्ध मालकाला महावितरणच्या कर्मचार्यांनी जबर मारहाण केली.

वृद्ध वीजग्राहकास मारहाण
महावितरण कर्मचार्यांची दादागिरी : वीज पुरवठाही केला खंडित
नायगाव : आंबा बागायतदाराची झाडे बळजबरीने कापणार्या महावितरणच्या कर्मचार्याला मज्जाव करणार्या वृद्ध मालकाला महावितरणच्या कर्मचार्यांनी जबर मारहाण करून त्याचे बेकादेशीरपणे वीज कनेक्शन खंडित करण्याचा प्रयत्न वसईत केला. या प्रकारानंतर स्थानिक संतप्त झाले आहेत. रविंद्र देसाई (६८, रा. शनिमंदिर रोड, वसई) असे वृद्ध इसमाचे नाव आहे. वसईत काही दिवसांपासून महावितरणमार्फत झाडे छाटणीचे काम सुरू आहे. रस्त्यालगतच देसाई यांची आंब्याची झाडे आहेत. वीजवाहक वाहिनीला त्याचा स्पर्श झाल्याचे कारण देत महावितरणने आगाऊ नोटीस न देता ही झाडे कापण्यास सुरूवात केल्याने देसाई यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर कर्मचार्यांबरोबर झालेल्या बाचाबाचीनंतर त्यांना जबर मारहाण करण्यात आली. यानंतरही कर्मचारी थांबले नाहीत. त्यांनी देसाई यांच्या घराचा वीजपुरवठा बेकायदेशीररित्या खंडीत केला. यानंतर मात्र काही सामाजिक कार्यकर्त्यांना प्रकार समजल्यावर त्यांनी अधिकार्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर वीजपुरवठा रात्री उशिराने सुरू झाला. काही दिवसांपूर्वीच देसाई यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली होती. या मारहाणीनंतर त्यांच्या डाव्या डोळ्याला सूज येऊन दुखापत झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत वैद्यकीय तपासणीनंतर वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पो. नाईक डी. एम. वाघ करीत आहेत. महावितरणने आगाऊ झाडे छाटणीबाबत माहिती देणे आवश्यक होते तसे न करता बळजबरीने झाडे कापणे यास विरोध केल्याने कर्मचार्यांनी मारहाण केल्याचे देसाई यांनी लोकमतला सांगितले. (वार्ताहर) कारवाई होणार ४कामानिमित्त आपण बाहेर आहोत. याबाबत सुपरवायझर कडून माहिती घेऊन योग्य कारवाई करण्यात येईल, असे वसई महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुरेश कादी यांनी सांगितले.